HAPPY NEW YEAR

घडाळ्याचा काटा एका तालात, २४ तासांचा ठेका धरत, आपली आवर्तने पुरी करत फिरत राहतो. आणि एका क्षणी जाणिव होते की "संपले हे ही वर्ष"!
दररोजच्या घडामोडींचा हिशेब करण्याची सवय नसलेले मन, या क्षणी मात्र वर्षभराचा लेखा- जोखा घेऊ लागते. काय मिळवले, गमवले चा हिशोब. या हिशेबात, शिल्लक काहीही येवो. अनुभवाच्या साठ्यात भर पडली, हे सालाबादाप्रमाणे मान्य होते आणि काही नकोसे प्रसंग येऊन गेले असल्यास 'देवा येत्या वर्षांत काही दिलेस नाहीस तरी चालेल परंतू आहे ते  हिरावू नकोस' इथवर मन येऊन ठेपते.
                    आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांत आपण वेगवेगळ्या काट्यांना बांधलेलो असतो असं मला वाटतं. सेकंद काट्याला बांधलेलो असताना, बेभान- वेगवान आयुष्य जगत असतो तेव्हा या हिशोबांत गुंतण्याइतकाही वेळ नसतो. जरासे स्थैर्य तुम्हाला मिनिट काट्याला बांधून जाते आणि आयुष्यात काय घडते आहे, हे पाहण्याची सवड होऊ लागते.
   सरणारे वय, जेव्हा तुम्हांलाहळूच  तासकाट्याला बांधून जाते, तेव्हा मंदगतीने सरणारा वेळ अगदी दिवसागणिक का लेखा- जोखा घेत रहायला लावतो.

आज या क्षणाला, आपण यांपैकी कुठल्याही काट्याच्या टोकाला बांधलेले असू, आपणा सर्वांना जो मध्यबिंदू ताकदीने फिरवतोय, त्याचे नाव आहे "पुढच्या क्षणी काय?" ज्याचे उत्तर कुठल्याच काट्याकडे नाही, कुठल्याच टोकाकडे नाही. त्यामुळे वाटतं की आपल्याला खरी देण आहे ती फक्त "आज" ची! या क्षणाची.

काटे बदलत राहतील, कॅलेंडर बदलत राहतील,  ताजा उरेल तो फक्त - "आज".
आयुष्यात घडून गेल्या त्या घटना होत्या. घडणार आहेत, त्या घटना ठरतील.

देवाजीच्या बटव्यातून जगायला मिळालाय तो फक्त, आपल्या हक्काचा एक "आज"! लेखा जोखा संपवून तो "आज" मात्र सिलेब्रेट करत रहावा.
येत्या वर्षी तुमच्या आयुष्यात येणारा दररोजचा "आज" तुम्हाला खूप समाधान देणारा ठरो! 
या शुभेच्छेसह- नववर्षाभिनंदन!

Happy New Year!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments