संन्यस्त

माझ्यामधला संन्यस्त वैरागी
नेसत नाही भगवी वस्त्रं
चढवत नाही लाकडी खडावा
नाही झोपत जमिनीवर
की जगत नाही,
झाडपाल्यांवर!

स्वच्छ नेटका
शांत स्तब्ध
आत्ममग्नसा,
अडकवतो खांद्याला 
रिकामी झोळी आणि
करत राहतो मुसाफिरी,
या दुनियेची..

तो जगतो, केवळ
आत्ताचा क्षण! कारण
झटकलीय त्याने
कालची काजळी
उद्याचा घोर..
वागवत नाही तो
ओझं षड्रिपूंचं
आपल्या डोईवर...

रिकामी झोळी
रिकामीच राखण्याचं
व्रत तेवढं घेऊन,
राहतो करत मुसाफिरी..
माझ्यामधला... संन्यस्त वैरागी!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments