Monday, 30 April 2018

मन्यू

........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, पण तेही वेळेनुसार मागे पडले. आता आता मी या निष्कर्षाला पोचलेय की माझी मैत्री माझ्यापेक्षा अधिक अनुभवी, अधिक उन्हाळे पाहिलेल्यांशीच होते आणि टिकते. या निष्कर्षाला अनुसरून माझ्या 'नुकत्याच होऊ घातलेल्या' मैत्रिणीने मला सकाळीच फोन केला. तुझ्या घराजवळच शूट आहे, येतेस का? दिवसभर छान गप्पा होतील म्हणाली. त्या दिवशी मलाही फार कंटाळा आलेला होता. मी तिचा फोन झाल्यावर विचार केला दिवसभर नसले तरी एखाद- दोन तास विरंगुळा म्हणून  शुटिंग पहायला काय हरकत आहे?
      तशी तिथे पोहोचले तो नेमका हिचाच शॉट लागणार होता. एका तथाकथित सिरियलचे ते शुटिंग होते. सिरियलमधील कुटुंबाकडे नुकताच "होळी= रंगपंचमी" अर्थाचा सण पार पडला होता व आता 'फॅमिली फोटो' काढण्याची लगबग होती.  सगळ्या रंगलेल्या चेह-यांमुळे हिरोईन कोण व व्हिलन कोण हे मलाच काय खुद्द डायरेक्टर साहेबांनाही ओळखू येत नव्हते. ते पुन्हा पुन्हा एकाला दुस-याच नावाने हाक मारत आणि सगळा गोंधळ होई. शेवटी हो- नाही करता करता सगळे एकमेकांशेजारी उभे राहिले. आता कुटूंबातील हेवेदावे सर्वांनी दाखवायचे होते. म्हणजे फोटोपुरता एकमेकांशेजारी उभे राहिले तरीदेखील कुचके बोलणे, तोंडे वेंगाडणे, डोळ्यांनी खाऊ की गिळू असे पाहणे वगैरे अ‍ॅक्टिंग सगळ्यांना करायची होती. तेवढं घडवून आणायला डायरेक्टर नावाच्या सदगृहस्थाचा मात्र घाम निघत होता. आणि इतक्यात शॉट कट झाला, रिटेक ठरला. माझा तेवढा तासभर मजेत गेला.
                तेवढ्यात ती (माझी होऊ घातलेली मैत्रिण) तणफणत माझ्यापाशी आली आणि पाणी शिंपडावे तसे हात एक- दोनदा हवेत झटकत म्हणाली, "या मेल्यांचं डॉयलॉग करेक्शन निघालंच! खरं तं कित्ती सोप्पय, एकमेकांना कुचकं तं बोलायचंय! पण लेखकाने डिसेंsssssटं कुचकं लिहून 
दिलंय! अन् अता लेखकू फोनवर रिचेबलच नाहीत" त्या तणफणण्याने श्वास लागून दम घेत पुढे तीच म्हणाली "मरो. चल बै तोवर आपण बाहेर फिरू" मी अवाक वगैरे होत, "तू अशीच येणार? (तोंडाला रंग फासलेल्या अवस्थेत? असा मला सरळ सरळ प्रश्न करायचा होता, पण अजून पुरेशी गट्टी न झाल्याने मी सभ्य पवित्रा घेत विचारलं) "या कॉश्चुम मधेच?? " 
"हं!!! त्याने कै फरक पडतोय?" सिरियलचा डायलॉग टाकल्यागत नाक उडवत हे ती इतक्या बेफीक्रीने म्हणाली, की मी आपोआप तिच्यामागे चालू लागले. 
    
  माझ्या सुदैवाने हे शुट जिथे लागले होते, ती एक न रहायला आलेल्या अतिश्रीमंत माणसांची कॉलनी होती. जेथील डुप्लेक्स बंगल्यांचे पझेशन अजून व्हायचे होते. त्यापैकीच एका सॅम्पल बंगल्यात, हा शुटींग सेट लागला होता. बाहेर मोठाच्या मोठा डांबरी रस्ता व दुतर्फा सुंदर झाडे लावलेली. मी शक्यतोवर तिच्या रंगपंचमी चेह-याकडे बघत नव्हते. आणि ती ही फार काही मला पहात नव्हती. तिला फक्त डावीकडे पहात चालण्याची सवय असावी. मी तिच्या उजवीकडून चालले होते. आम्ही बराच वेळ शांतपणे चालत राहिलो. कॉलनीच्या एन्टरन्सला वॉचमनचं खुराडं होतं. तो आम्हाला (स्पेशली तिला) पाहून फिसक्कन हसलाय असं मला वाटलं. तिथून आम्ही मागे वळलो. अचानक तिच्या डाव्या हाताला असलेल्या मोकळ्या ग्राऊंडसदृष्य जागेकडे पाहून ही जवळ-जवळ किंचाळली "अय्या! आत्ता इथे अभिमन्यू असता तर....!!!"  आता हिची माझी पुरेशी गट्टी नसल्याने अभिमन्यू म्हणजे हिचा मुलगा की नवरा, हे मला कळेना तोवर दुसरा चित्कार आला "मन्यू कसला खुश झाला असता याsssर!! " आता जनरली अभिमन्यू या नावाचे "अभि" असे छान टोपण नाव होऊ शकत असता हीने त्याला "मन्यू" का केला असावा या विचारात मी असताना तिने तिसरेही वाक्य टाकले, "शी करायला कस्ला हॅप्पी झाला असता तो" ... माझ्या तोंडून "श्शीss!!" असा उद्गार अगदी नकळत बाहेर पडला बरं का, आणि तिने जे काही रागाने पाहिलं माझ्याकडे (की हिला सिरियलमध्ये व्हिलन म्हणून का घेतलंय हे क्षणार्धात मला समजलं, तरीही प्रसंगाचं भान राखून मी सभ्य पवित्रा घेत) "आय मीन, शी करायला म्हणजे...?" असा प्रश्न फिरवला.
"अगं मन्यू, मन्यू!! मा डॉगी!! कै बै तू पण... तुला सांगितलं नै का मी? तो आजारी होता म्हणून मी ८ दिवस शूट टाकून गेले ते. कित्ती रडले मी माहितेय? तुला मन्यू पहायचाय? थांब" असे म्हणून तिने मला त्याचा एक फोटो दाखवला. मग दोन- तीन- सात- तेरा- सतरा- वीस फोटो, तिने दाखवले. आणि २०व्या फोटोची पापी घेतली. (हो मी मोजलेत) मग तिने घरी फोन केला व डॉगीच्या केअर टेकरला काही सूचना केल्या. त्याची शी कशी झाली वगैरेपण विचारलं (किती तो इंटरेस्ट?) मग पुन्हा माझ्याकडे मोर्चा वळवत, मन्यूला इक्कूसा असताना घरी आणल्यापासून, ते आज सकाळी शूटला येईपर्यंतची सारी कहाणी इत्यंभूत मला सांगितली (मी या क्षणी कुत्र्यांचे आजार व संगोपन यावर लेख लिहू शकते) पण ती तेवढ्यावर न थांबता. त्याने काय खाल्यावर कुठल्या रंगाची...... इतक्यात तिला डायरेक्टर साहेबांचा फोन आला (मी वरतीच त्यांना "सद्गॄहस्थ" का म्हणाले, ते कळलं?) त्या फोननंतर, मी गेले तासभर मन्यूपुराण न थकता ऐकल्याने तिच्या मनात माझ्याबद्दल अपार आदर बिदर दाटून येत, माझ्याकडे फार्फार प्रेमळ नजरेने पहात ती म्हणाली "चल.. जाऊ सेटवर. मिळाले वाट्तं कुचके डायलॉग्ज!  बरं तू जायची घाई करू नकोस हां. मला तू खूप आवडालीयेस आणि आप्ल्याला खूssssप गप्पा मारायच्यात. आणि मन्यू..." आतापावेतो माझ्यात जरा हिम्मत आली होती.. तिला तोडत.. अगं हो, तुला बोलंवलंय ना जा तू, मी निघेन आता. जरा काम आहेत म्हणाले. तिने आग्रह केला पण तो कसाबसा टोलवण्यात मी यशस्वी झाले. शेवटी अत्यंत नाईलाजाने ती "बराssय ये पुन्हा, काही दिवस इथेच आहे शूट" म्हणाली. व रंगमाखले गाल माझ्या दोन्ही गालांना लावत, हवेत किस केले. 
                    
                  मी सुसाट कार चालवत घरी परतत असताना, नुकत्याच होऊ घातलेल्या या मैत्रिणीचे व्हॉट्स अ‍ॅप मेसेजेस आले. नोटिफिकेशनवर दिसले "20 मेसेजेस!" मन्यूचे ते फोटोग्राफस अजिबातच डाऊनलोड न करण्याचा निश्चय मी करतानाच... माझी मैत्री नक्की होऊ तरी कुणाशी शकते? हा उत्तर न सापडणारा जुना प्रश्न, मला नव्याने भेडसावू लागला....

-बागेश्री

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...