जबाबदारी

तिरसट माणसांची एक जम्मत असते. ते आपल्या स्वभावामुळे सगळ्यांना स्वतःपासून तोडत जातात. शेवटी आपापसात म्हणतात "मी म्हटलं नव्हतं? सगळे स्वार्थी असतात. कुणी कुणाचं नसतं. बघ गेले ना सगळे सोडून?" 
             पण सविस्तर विचार केला तर आपल्या सगळ्यांच्या आत, कुठलातरी असा (अव)गुणधर्म असतोच की त्यामुळे माणसं बरेचदा आपल्याला दुरावतात. आपण मात्र आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यापेक्षा, दुरावलेल्यांवरच बोट ठेवून मोकळे होतो. कारण ते करणं सोपं आणि सोयीचं असतं. मुळात मनुष्य हा आळशी प्राणी असल्याने, स्वतःचे परिक्षण करण्यापेक्षा इतरांना लेबल्स लावून टाकणे त्याला जास्त सोपे जाते. शिवाय आपण किती चांगले, आपल्याला भेटणारेच कसे वाईट, ही सोयीची भावना अजून घट्ट करता येते. 
          आत्मपरीक्षण सरसकट सगळे का करत नाहीत? तर असले परिक्षण म्हणजे स्वतःचे वाभाडे काढणे किंवा स्वत:ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे. हा (गैर)समज. या पिंज-यात आपणच आपल्याला उभं करायचं, स्वतःला गिल्टी अथवा फॉल्टी करार द्यायचा. कुणी सांगितले हे उद्योग? स्वतःला हे असं कमी लेखून घेण्यापेक्षा "मी आहे तसाच/ तशीच आहे" अशी मोघम समजूत काढणे जास्त सोपे नाही का. त्यानुसार "मागच्या पानावरून पुढे" असे आपले जगणे आपण अव्याहत सुरू ठेवतो.
              पहायला गेलं तर आत्मपरिक्षणाकरता भांडवल लागतं काय. जरासं धाडस अन् परखड नजर.  स्वतःच्या वागण्यातील चूक बरोबरची शहनिशा करणारी नजर. अन् त्या अनुषंगाने स्वतःत आवश्यक बदल घडवत जाण्याचं धाडस. आणि हीच तर परिपक्व होत जाण्याची सुंदर प्रोसेस! नाहीतरी शरीर व वयाची वाढ निसर्ग क्षणभरही न थांबता करतोच आहे.                   
            जगताना ज्यांना आपण दैवत मानतो त्यांच्याकडे पाहण्याची परखड नजर कुठल्यातरी क्षणी आपल्याला मिळते. आणि आपले "दैवतही चुकू शकते " हा साक्षात्कार होतो. हीच ती आवश्यक असणारी परखड नजर. तिचा झोत जरासा आत, आपल्या दिशेने वळवला की त्या उजेडात सहज घडतं ते, आत्मपरिक्षण. परंतु साधनेशिवाय सहजता येत नाही. 
                  
विवेकानंद म्हणाले होते, "कुणाला काहीही वाटले तरी आपण आपल्या जाणिवांच्या वाटेवर अथक चालत रहावे" हे सांगताना, जाणिवा प्रगल्भ करून घेण्याची जबाबदारी त्यांनी हळूच बिटवीन दि लाईन्स मध्ये पेरून टाकली. ही प्रगल्भता मिळवण्याचे उपयुक्त टूल आत्मपरीक्षण असू शकते.
       खरं सांगायचं तर जोवर "आपण जन्म घेऊन इथे का आलोय" ह्या प्रश्नाचा भोवरा मनात गरगरत नाही तोवर परिक्षणाचं टोक काही हाताशी लागत नाही. शिवाय हे असे विचार/ परिक्षण वगैरे मुद्दाम करण्याची गरज असतेच कुठे? तुम्ही तुमच्यात असताना किंवा तुम्ही तुमच्यात नसताना किंवा असेच, निवांत अंग सैल सोडून कुठेतरी उगाच बघत बसलेले असताना "आपण इथे का आलोय" चा किडा नकळत डोक्यात वळवळू लागेल आणि स्वतःचा तळ जोखण्याची धडपड आपसूक सुरू होईल..... तेव्हाच विवेकानंदांनी सोपवलेली जबाबदारी, खऱ्या अर्थाने कळून येईल.
-बागेश्री देशमुख

Post a Comment

0 Comments