डोह

असा एक डोह
असते मी शोधत
डुंबता येईल 
ज्यात मला,
माझ्या अस्तित्वासकट...

मी भिरभिरतेय
शोधतेय
कधी कुणाच्या अपार करुणेत,
कधी कुणाच्या निस्पृह भावनेत
कुणाच्या अर्थात,
कुणाच्या परमार्थात
कुणाच्या असण्यात,
कुणाच्या नसण्यात
कुणाच्या अंगणात किंवा
कुणाच्या भंगण्यात
एखाद्याच्या जाणिवेत
माझ्या तरी नेणिवेत
पण मला सापडतच नाही
एकही डोह,
जो सामावून घेईल आहे तसा
एकही प्रश्न न करता आहे की, तू कोण... तू कसा?

वाटलं होतं,
घर सुटल्यावाचून
मीपण तुटल्यावाचून
होणार नाही सार्थ
लाभणार नाही अर्थ
ह्या जगण्याला...
तेव्हापासून आजवर
फिरुन झाले जगभर
नाही लागली हाती
हक्काची कुठली नाती..

म्हणून सांगते एकदा 
गवसल्यावर
सोडू नये,
हक्काच्या डोहांचे मन कधी
मोडू नये...
-बागेश्री

Post a Comment

0 Comments