Monday, 18 March 2019

Ginie

एखादवेळी फार विचार न करता गाडी काढावी आणि कुठल्यातरी रँडम दिशेने प्रवास सुरू करावा. एकट्यानेच. आपली गाडी, रस्ते अनोळखी! त्यावरचे खाचखळगेही अनोळखी. स्टेअरिंगवरची पकड आणि प्लेअरवरचा तलत मात्र ओळखीचा! काही वेळ गेल्यावर, मोकळा रस्ता लागल्यावर, एक उसासा बाहेर पडतो. दीर्घ नि:श्वास. तडकाफडकी निघाल्यामुळे अपूर्ण राहून गेलेल्या गोष्टींकरता. पण; डोळ्यांपुढे असतो लांबलचक, एकटा सुस्त पडलेला नागमोडी, डांबरी रस्ता. अंगावर मृगजळांचे दागिने घेऊन पहुडलेला. नकळतच हसू साकळतं ओठांच्या कोप-यांत. आणि गुणगुणू लागतो आपण. स्टेअरींगवर ताल धरतो, तेव्हा वाटतं, गेले कित्येक दिवसात मन हे असं मोकळं झालंच नाहीये. आजूबाजूला उन्हाच्या रखरखीतूनही फुललेला चाफा पाहिला की वाटतं, ही खरी जगण्याची जिद्द. सुगंधी जिणे. मग वाटतं, कुठे असतात एरव्ही हे विचार. का हा हिरवा रंग, एरव्ही नाही खुणावत. हे प्रखर उन एरव्ही का नाही दिपवून टाकत आपल्याला. की आपला मेंदू जगण्याच्या विवंचनांनी, ध्येय, महत्त्वाकांक्षा यांनी इतका तुडूंब भरलाय की जागाच उरली नाहीये इतर कशासाठी.... पुन्हा एक दीर्घ नि:श्वास!!
अंतर सरत जातं.... आपला एकांतातला प्रवास आपल्याशीच खुलत जातो. जसे पुढे जाऊ तसे सा-या विवंचना एक- एक करत सुट्ट्या होत जातात, हेलकावे घेऊ लागतात, तलतबरोबर!

एखाद्या छान जागी, मनासारखी कॉफी घेऊन परतीचा प्रवास सुरू करेस्तोवर तर मन- शरीर- मेंदू हलके झालेले असतात... परतीच्या प्रवासात साद घालावी हेमंतकुमाराला. त्याच्या गाण्यात हरवून गेलो असता, रिकाम्या मेंदूत येऊ लागतात अनेक दिवसांपासून न सुटलेल्या सर्व प्रश्नांची चपखल उत्तरं, अव्वल तोडगे. तेव्हा जाणवतं, कधी कधी समस्यांपासून दूर जाऊन उभे राहिलो की उत्तरे अशी धावत येतात, गळामिठी मारतात!
कधीतरी हे असं, अन्प्लॅन्ड, ड्रायविंग सीटमधे बसून, स्वतःचा पूर्ण ताबा घेऊन, स्वतःला फिरवून आणावं एका वेगळ्याच प्रदेशातून. आपल्याला माहिती नसतं, आपल्या आत कुणीतरी खास आहे ते. जरासा मोकळा होताच सगळी तोडगी शोधून हाती देणारा एक जादुई, जिनी!
-बागेश्री

No comments:

Post a Comment

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...