आयुष्यातलं एक पान

एखादा दिवस अंगावर, अत्तर शिंपडून येतो
आयुष्यातलं एक पान, सुगंधी करून जातो!
अशाच एका पानाचा
कोपरा खुण म्हणून
ठेवून द्यावा मुडपून...
आयुष्यात अप्रिय घटनांची 
मालिका सुरू असताना 
हलक्या हाताने तेच 
पान जरासे उघडून
कोपऱ्यामधल्या टेबलावर 
द्यावं हळूच ठेवून
बघता बघता खोलीभर 
आल्हाद दरवळ पसरतो
मनावरचा ताण 
हळू हळू वितळतो

अशी पानं असतातच
पुन्हा पुन्हा जगण्यासाठी,
हरवलेलं आपलं काही
आपल्या आतच शोधण्यासाठी!
मनभर जगून झाल्यावर
पुस्तक घ्यावं मिटून
आयुष्याशी भिडावं
नवा डाव थाटून...
-बागेश्री  

Post a Comment

0 Comments