अल्बम

फोटो नसते तर आठवणी नसत्या
बालपणीचे
किस्से नसते
तेव्हापासून
आत्तापर्यंत झालेले बदल
दिसले नसते
एखाद्याला चिडवायचे
एखाद्याला बुडवायचे
एखाद्याला एखादीच्या
नावाने चिडवायचे
खोल मनात
यातले काही
कधीच कुठे
सापडले नसते

मित्र सवंगडी
शाळा रस्ते
कॉलेज टीचर्स
फेवरेट अड्डे
गोला पा.पू
पावभाजी
चहा वडापाव
कांदाभजी
तरुणपणीच्या पावसाने
प्रौढांना खुणावले नसते
फोटो नसते तर
भूतकाळाच्या बटव्यात काही
सापडले नसते

जुने अल्बम बिल्बम
काढून जेव्हा
आई उगाच बसते
अलगद बोटे फिरवून
चिकटून बसले प्लास्टिक
हळूच सुटते
ब्लॅक अँड व्हाईट
आठवणींना तेव्हा फुटतो
रंगीत पाझर
प्रवास दशका दशकांचा
बसल्याजागी
घडतो भरभर
आठवणींचा घरात
घुमतो हळुवार
मग अखंड जागर
अल्बम जेव्हा
पुन्हा एकदा
मिटतो जातो
आपुल्या जागी
घरभर होते
पुरून उरते
आठवणींचे
हळवे अत्तर
-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. Amazing... किती छान लिहितेस

    ReplyDelete