मर्दानी - 2

मर्दानी- 2 पाहिला.
वरवर पाहता एका बलात्काराच्या केसभोवती फिरणारा सिनेमा असला तरी त्याला अनेक कंगोरे आहेत. प्रामुख्याने हा सिनेमा पुरुषप्रधान संस्कृती, त्यातून आलेली दहशत आणि बाईच्या कर्तृत्वाकडे हीनपणे पाहण्या-या वृत्तीला मारलेली सणसणीत चपराक आहे.
              आदिम काळापासून आजवर निसर्गाने दोनच गटात मनुष्य प्राण्याचं वर्गीकरण केलंय. स्त्री व पुरूष! परंतु माणूस आणि त्याचा समाजशीलपणा जसजसा विकसीत होत गेला तसतसा पुरुष गट स्त्री गटाला कमजोर ठरवत गेला. किंवा स्त्री गटाचं सामर्थ्य वेळीच लक्षात घेऊन सुरुवातीपासून त्याला मुठीत ठेवत गेला. दुसरा गटही खळखळ न करता मुठीत जात गेला. हे जितकं मुरलं, रुजलं, समाजाचा भाग होत गेलं तितका या वर्गांमधला भेद वाढत गेला. जेव्हा जेव्हा दुस-या गटातल्या लोकांनी आपली हुषारी, सामर्थ्य कर्तृत्वातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तिथे त्यांना पुरुष वर्गाकडून फार वेगवेगळ्या थरांवर भिन्न पद्धतीचा त्रास देण्यात आला. देण्यात येतो. तिची अर्धी अधिक शक्ती स्वतःचं ध्येय पूर्ण करण्यापेक्षा या संघर्षात मोडते. हा त्रास पुढेही होत राहिल असे मात्र नको म्हणूया कारण या गोष्टींना तोंड फोडण्याचं, स्पष्ट बोलून त्यावर प्रकाश टाकण्याचं काम "मर्दानी 2" सारखे सिनेमे करताहेत.  
        समाजातील जात- धर्म- आरक्षण नावाचे वर्गीकरण फार नंतरची समस्या आहे. मूळ समस्या वर नमूद केली ती आहे, यावर भाष्य करणारं एक वाक्य राणीच्या तोंडी येतं तेव्हा प्रेक्षकवर्गातून दमदार दाद येते. टाळ्या येतात. स्त्री पुरुषांच्या बरोबरीबाबत सिनेमात मुलाखत देताना ती म्हणते "बराबरी छोडो. कम सें कम हिस्सेदारी भी मिल जाए तो बहोत है!" जिथे स्त्री- पुरुषाने एकत्र येऊन, एकमेकांना पुर्ण करावे अशी योजना निसर्गाने आखली तिथे ही हिस्सेदारी मिळावी म्हणून स्त्रियांना करावा लागणारा संघर्ष आपल्या समाजाकरताच एक लाजिरवाणी गोष्ट आहे.

हा चित्रपट फक्त इतका संदेश देऊन गप्प बसत नाही, तर फार मोलाचा आणि विचारात घेण्यासारखा प्रसंग या सिनेमात येतो. तो म्हणजे, कोटा या ठिकाणी एस. पी. होऊन गेलेली राणी, कळत न कळत तिथे २० वर्षांपासून काम करणा-या जुन्या, अनुभवी, स्थानिक पोलीस अधिका-यांशी फार जुळवून घेत नाही. त्याचे कारण तिला आधी आलेले अनुभव असू शकतात. तिला या पदापर्यंत पोचण्याकरता करावा लागलेला संघर्ष असू शकतो,  वा ती स्त्री आणि तिच्या हाताखाली काम करणारे पुरुष आहेत यामुळे होणारी धुसमूस असू शकते. परंतु ती ज्या अट्टल गुन्हेगाराचा तपास करत असते, त्याकरता तिला याच स्थानिक व अनुभवी लोकांची मदत घ्यावी लागते. तेव्हा तिने पत्करलेली शरणागती सिनेमातला मह्त्त्वाचा व बोलका प्रसंग आहे. हा प्रसंग स्त्रीला पुढे जायचे असेल तर तिनेही पुरूष वर्गाशी जुळवून घेत. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, त्यांच्यातील धैर्याचा, औदार्याचा मान राखला पाहिजे तरच "एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ" घडणार आहे, असे ठळकपणे सांगणारा आहे. महत्त्वाचा आहे.

          स्त्रीवर आपले वर्चस्व सिद्ध करण्याकरता अनेक बलात्कार करणा-या एका पाशवी गुन्हेगाराला शोधता शोधता, समाजाच्या विचारसरणीवर प्रकाश टाकणारा, आपल्या आतील माणूसपण शोधायला भाग पाडणारा हा सिनेमा, बघण्यासारखा आहे.
-बागेश्री

Post a Comment

1 Comments