माझा गाव- रणजित देसाई

#Bookshelf #माझागाव
सुट्टी म्हणजे पुस्तकांच्या राशीत लोळायचं, उठायचं बसायचं, अखंड वाचायचं! आणि पुस्तक म्हटले की रणजित देसाई नाव मला वगळता येत नाही. या वेळी "माझा गाव" नावाचं पुस्तक हातात घेतलं. सध्याच्या वातावरणात जिथे कोरोनाने धुमाकूळ घातलाय त्यापासून तुटून एका वेगळ्याच गावी जाऊन बसले. बेळगावच्या परिसरातले डोंगर- टेकाडातले गाव. गावात नदी आहे, देऊळ आहे, विविध जातीचे थर आहेत कुलकर्णी- पाटलांची सत्ता आहे. पण त्या सत्तेत स्वार्थापेक्षा एकमेकांना जगवण्यासाठी लागणारा माणुसकीचा खळाळता झरा आहे. म्हणूनच गावावर अनेक संकटं येऊन गेली तरी माणसा- माणसांतला ओलावा आटलेला नाहीय...
             कथेचा सुत्रधार त्याचं हे गाव सोडून निघाला आहे, त्याच्या मनात आठवणींनी गर्दी केलीय. नदीकाठाला वळसा देऊन तो पुढे जाताना, टेकडीवरचं लक्ष्मीचं देऊळ त्याच्या नजरेत भरतंय. समोरच्या पांधीतून पुढे जाऊन पुर्वेची टेकडी ओलांडली की तालुक्याला जाणा-या बसने तो बेळगावी जाणार आहे... त्याचं मन भरून आलं आहे. या उंचावरच्या पांधीतून पलीकडे गेला की गाव दृष्टीआड होईल याची त्याला जाणीव आहे. न राहवून मागे वळून पाहताना एकाच ठिकाणी खिळल्यागत तो उभा राहिला आहे. दूर माडांच्या चौकोनाकडे त्याची नजर लागलीय. त्या चौकोनी जागेतच त्याचा दिमाखदार वाडा उभा आहे. इनामदारांचा वाडा. आणि हे स्वतःचं गाव सोडून, भविष्याकडे वाटचाल करताना त्याचं मन त्या वाड्यात, नव्हे. वाड्यातल्या एका व्यक्तीत अडकले आहे.... ती व्यक्ती त्याच्याशिवाय किती एकटीये, याची जाणीव त्याच्या भारलेल्या मनाला अधिकच अस्वस्थ करते आहे.....
या पार्श्वभुमीवर सुरू झालेली गोष्ट त्या काळातल्या इनामदारकी, सत्तालोलूप नसलेल्या उलट आपल्या पाखराखाली असलेल्या या गावाचं आपण काय आणि कसं देणं लागतो याची जाणीव मनात जागृत असलेल्या अप्पासाहेबाचे चित्रण करते. ते या कथेचे नायक शोभतात. अप्पासाहेबांचा मुलगा त्यांच्या अगदीच विरोधी वृत्तीचा. बाहेरख्याली. परंतु तोच आपला अधिकृत वारस असल्याने अप्पासाहेबांची पदोपदी होणारी कोंडी. सोन्यासारखी सून, उमा. तिचे तुटलेले माहेर. लग्न होऊन दहा वर्षे उलटून गेली तिला मूल नसल्याने तिची होणारी तगमग आणि अप्पासाहेबांचा दुसरा मुलगा म्हणजेच कथेचा सुत्रधार, जयवंत. तो अवघा आठ वर्षांचा. म्हणजे उमा घरात आली तेव्हा दोन वर्षांचा जयवंतच जणू तिचे मूल झालेला. त्याने फक्त उमेच्या पोटी जन्म घेतलेला नाही. पण उमेने आईची जागा भरून वर काकणभर जास्तच त्याच्यावर माया केलेली आहे. शेजारी राहणारे तात्यासाहेब गावातले मानलेले ब्राह्मणाचे घर आहे. तात्या- अप्पा बालपणीचे मित्र आहेत. तात्या आणि काकूने गावाला आपलंस केलंय ते फक्त त्यांच्या प्रेमाने नव्हे तर ते गावचे अनाधिकृत वैद्य आहेत. कुठल्याही व्याधीवर तात्या उपचार करू शकतात. ते वैद्य म्हणून धावत जातात तेव्हा त्यांना कुठलाही धर्म, जात त्याज्य नाही.
एक आदर्श गाव कदाचित रणजित देसाईंच्या मनात रेंगाळत असावा. त्यातून त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं असावं. जिथे वर्षानुवर्ष जमीनदारकीने पिचलेला समाज भारताच्या इतिहासाने पाहिला आहे, तिथे देसाईंच्या या पुस्तकात माणुसकीने व्यापलेला गाव, समाज पाहिला की जाणवतं असं काही खरोखरच असलं असतं तर आपला समाज फार पूर्वीच माणुसकीने ओतप्रोत, समृद्ध असा झाला असता. जगावर, भारतावर कुठलीही आपदा कोसळल्यावर लोकांनी सर्व थरांतून मदत करावी. एकमेकांना जगवावे हे आवाहन करण्याची वेळ आली नसती. कृती आपोआप घडत गेली असती. तो समाज- स्वभाव ठरला असता. अतिसुखाने नांदणा-या देसाईंच्या या गावात जत्रा भरतात, सोहळे होतात. अप्पासाहेब सूनेवर प्रेम-माया- विश्वास आपल्या पोटच्या पोरापेक्षा अधिक करतात. आपल्या पोरांत असलेल्या दुर्गुणांमूळे या घरात आणलेल्या या मुलीला "पुरेसे" सुख मिळालेले नाहीये, याची जाणीव अप्पासाहेब ठेवून आहेत. आपल्या अवती- भोवती कुठे अशी व्यक्ती सापडते का, आपण शोधू लागतो...
    गावावर अनेकवेळा अनेक संकटे येतात. अप्पासाहेब धिरोदात्त. परोपकारी. एकदा गावावर महामारी ओढवते. माणसे पटापटा मरून जातात. प्रेतांची विल्हेवाट लावायला तरूण धजावत नाहीत. अप्पासाहेब स्वतः तिरडी धरायला पुढे होतात तसा गाव जागा होतो. पुढे एकदा दुष्काळ येतो. अप्पासाहेब धनधान्याचे कोठार खुले करून देतात. हेच गाव इनामदारांचं कोठार बघता बघता रिकामं करतात.
      पुढे अप्पासाहेबांच्या मुलावरच त्याच्या आततायी स्वभावामुळे बाहेरख्यालीपणामुळे नको ते बालंट येतं. तेव्हा मात्र हवालदिल अप्पासाहेब, ज्याला मायेने गोंजारलं तेच गाव यावेळी अप्पासाहेबांच्या विरोधात उभं ठाकल्यावर हललेले अप्पासाहेब, देसाई आपल्या लेखणीतून चपखल उभे करतात. गावात पडलेली
दुफळी पुन्हा कसबाने जोडून घेतात. गाव पुन्हा अप्पासाहेबांना मानू लागतं. आपल्याला अप्पासाहेबांची 'काहीही घडलं तरी माझ्यावर कलंक नको, मी माझ्या पूर्वजांना काय उत्तर देऊ' ची पौराणिक कथांमधून दिसणारी भुमिका क्षणभर व्यथित करते. त्यापेक्षा जास्त तात्यासाहेबांतले राजकारण पाहून आपण दिग्मुढ होतो. या ठिकाणी देसाईंनी हे राजकारण ब्राह्मण तात्यांनाच का खेळायला लावले, आपण विचारात पडतो. तात्यांची झाकली मुठ, उघडी झाल्यावर, एकाएकी व्यक्तीरेखेतला हा बदल पचायला जड जातो.
     गावावरच्या एका दरोड्यात अप्पासाहेब स्वतः लढून मृत्यूमुखी पडतात तेव्हा मात्र आपण लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर वाचतो आहोत असा भास होतो. आपल्याला उमा मात्र कथेत धरून ठेवते. एका पातळीवर या अनेक गोष्टी घडत असताना, अप्पासाहेब -उमा, जयवंत- उमा यांच्यातील संवाद आपल्या मनातली हळवी तार छेडून जातोच. वहिनी दिरातले हे संवाद. मर्यादाशील असले तरी, त्यांच्यातलं आई मुलाचं नातं सतत आपल्याकडे डोकावून पहात असतं.  देसाईंचे हेच कसब हाती घेतेलेले पुस्तक सोडू देत नाही.
कथेच्या सुत्रधाराची या गावातली प्रेमाची माणसं एक- एक करून गळून गेली आहेत. आज तो वरच्या शिक्षणाकरता हे गाव सोडून जातो आहे. पांधीच्या तोंडाशी उभे राहून त्याला त्याचा जीवनपट उलगडत जातोय. "माझा गाव" म्हणून अप्पासाहेबांची ही कथा तो आपल्याला सांगतो आहे.  हे गाव सोडून जाताना, वाड्यात उमेचा नवरा असला, तिचा तो सहचर असला तरीही, अप्पासाहेब आणि तो नसल्यावर तिथे वहिनी किती एकटी आहे, याची जाणीव होऊन जयवंताचे पाय जागीच खिळले आहेत. डोळ्यांतून पाणी अखंड खळतंय....  वाड्याकडे पाहून त्याचे हात जोडले गेले आहेत. "तुला माहिती आहे, तू हाक मारशील तेव्हा मी धावत येईन" असे स्वतःशीच बोलून तो पांधीतून दिसेनासा झाला आहे....
-बागेश्री
#मला #उमजलेली #पुस्तके

Post a Comment

0 Comments