प्रवास

सगळं जग ठप्प झालेल्या या वातावरणात कशाची आठवण झाली असेल तर ती लांबच्या प्रवासाची. म्हणजे विमानातून, किंवा ट्रेनमधून करतो तो नाही. रोड ट्रिप्स. बस किंवा कारमधून केलेला. या अशा प्रवासात आपण भोवतालाशी ताल जुळवू शकतो. एकट्याने प्रवास करत असू तरी बाहेरच्या आसमंताची अखंड सोबत असते. बाहेर आकाशाचा घुमट असतो, आत आपण असतो. एकटे असून एकटे नसतो. एखाद्या घाटातून प्रवास घडत असेल तर मग बोलायलाच नको. एकीकडे डोंगर एकीकडे दरी मधे आपण असतो. अशा पावसाळी दिवसात तर वाट चुकलेला एखादा ढग दरीत हेलकावे खात असलेला हमखास दिसतो. गाभूळलेल्या आकाशाखालचा असा लांबवरचा प्रवास संपूच नये वाटतं. हातात एखादं पुस्तक असेल तर बहार. आणि नसेल तरी हरकत नाही. बाहेरून आत काहीतरी झिरपत असतं ते भरभरून साठवायचं. काच खाली घेण्याची सोय असेल तर आपल्यासारखे आपणच नशीबवान. थेट वारा पिता येतो. तो भिडत राहतो आपल्याला. कानाशी बोलताना केसांत विरून जातो. सूर्याचं दर्शन दुर्लभ असण्याचे हे दिवस. तरीही तो ढगांमागून आपलं अस्तित्व दाखवून देत असतो... सुर्यास्ताच्या सुमारासही हा प्रवास सुरू असेल तर मावळतीचं आकाश गुढगहिरं आकाश सोबतीला येतं. मनाची उसवण सुटी करणारं हे वातावरण शरीराला न जुमानता बेधडक आपल्या आत शिरत राहतं.... 
अशातच एक मोठा वळसा घेत बस कुठल्याशा ठराविक 
थांब्यावर जाऊन थांबते तेव्हा आपलाही गरमागरम चहाचा मूड झालेला असतो. चहाची वाफ नाकातोंडावर घेत आपण घाटातली हवा घोटाघोटाने आत घेतो... शांत निवांत होतो... फिरून पुन्हा प्रवासाला लागतो तेव्हा, धुसर झालेल्या दिवसात रात्र घुसत असते. त्याक्षणी वाटतं आपले शेकडो प्रश्न आपल्याला सोडून कायमचे निघूनच गेलेत आणि आता आपणही प्रवाही झालोयत. हे वाटणं फार छान असतं. सुखाची लहर अंगभर पसरवून हलकं करून टाकणारं असतं.... लॉकडाऊनमुळे हे जग ठप्प झालं तेव्हा तसं ते प्रवासाने हलकं होऊन जाणं फार आठवलं...
-बागेश्री

Post a Comment

0 Comments