Sunday, 11 May 2014

शब्द (स्फुट)

वही पार उलट- सुलट करून झाली!

एकाच तर पानावर लिहीत बसले होते,
त्या पानावर तारीख दिसते आहे, वारही आहे
मग लिहीलेला मजकूर कुठे?
काल नाही का,
लिहीताना डोळा लागला...
बरीच शोधाशोध झाली,
वही पार उलट- सुलट करून झाली,
हाती काहीच आलं नाही, तेव्हा त्याचा
नाद सोडला...

नंतर कधीतरी घर स्वच्छ करायला घेतल्यावर,
कपाटाखाली,
पलंगाखाली,
टेबलाखाली,
नुकत्याच धरू पाहणार्‍या जळमटात,
शब्दच शब्द!
मळलेले, धूळ साचलेले...
मग त्यांचीही स्वच्छता झाली...
हिवाळातल्या मऊ उन्हात वाळवून निघाले...!

पण आता मात्र,
पूर्वी योजलेला त्यांचा क्रम काही केल्या लागत नाहीये..

संदर्भ बदललेत,
व्यक्त होणंही!

-बागेश्री

No comments:

Post a Comment

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...