Thursday, 14 April 2016

काल तुजी चिमनी निजलीच न्हाई

तू गेलीस न् पणतीत वात तशीच -हायली...
तुळशीतल्या मातीला ओल तशीच -हायली
चुलीतल्या लाकडाची धग बुजलीच नाही
काल तुजी चिमनी,
निजलीच न्हाई..
सारवलं होतंस काल आंगन रेखीव
काढली होतीस रांगोळी आखीव
आज सडा सारवन झालीच न्हाई
घराला जाग काई आलीच न्हाई
घेतलं होतंस काल लेकरु थानाला
भाकर दिलीस भागल्या जीवांला
चिमनी चोच आज भिजलीच न्हाई
लागली भूक पन इझलीच न्हाई
चोचीने मांडलाय आकांत घरभर
सावरायला तिला तरी ये तू पळभर
हाकही जाईना दूर गेलीस अशी
कळंना ही झाली पडझड कशी
हातावरली मेंदी तुज्या रंगलीच न्हाई
काल तुजी चिमनी ,
निजलीच न्हाई....
                  बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...