मला ना कधी कधी...

मनाला जाच नको
ओठांना काच नको,
सलणारं सारं काही सांगून टाकावं वाटतं..
मला ना कधी कधी मोकळं व्हावं वाटतं..

कसले मळभ आणि दाटलेले मेघ
जगण्याची समजेना असली मेख,
नात्यालाच घट्ट मिठीत घ्यावं वाटतं...
मला ना कधी कधी पार रितं व्हावं वाटतं

निष्पाप असावा अंधार... आणि स्वच्छ प्रकाश
सोबतीला कुणी नको, फक्त कोरे आकाश
खुल्या आसमानी मग निडर वावरावं वाटतं...
मला ना कधी कधी जगून घ्यावं वाटतं..

गोंजारणार्‍या हातावर होत्या सुरकुत्या लाख
गोंजारून घेतलेल्या हाती उरली निव्वळ राख,
नसलेल्या त्या माणसाच्या कुशीत शिरावं वाटतं...
मला ना कधी कधी अशक्य साधावं वाटतं...

मावळतीचाच सूर्य हा... टिकेल कायम कसा
आलेल्याने जाण्यासाठीच घेतला आहे वसा...
सोबतीच्या हातानी सुटुच नये वाटतं...
मला ना कधी कधी शहाणपण सोडावं वाटतं...

- बागेश्री 

Post a Comment

0 Comments