Thursday, 14 February 2019

शेला


.... सारं जगणं एकवटून
ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण हाती घेऊन
उभा होता तू पाठवलेला एक गोप
त्याच्या ओंजळीत होता चुरलेला आम्रमोहोर...
तुझ्या- माझ्या एकांतातली खूण!
तो म्हणाला "यमूनेपल्याड श्रीकृष्ण आपली
वाट पाहतायत"
मला खात्री झाली,
पल्याड तू उभायस, कारण
यमुनेवर फुलले होते आनंदतरंग
हवेत उठला वैजयंतीचा दरवळ
शुभ्र ढगांना आले सावळे काठ
एकाएकी वातावरण धुंद कुंद झाले मुकुंदा
मला कळलं,
तू आलायस...!
पण का सख्या?
तुला चार पावलं पुढं यावं वाटलं नाही?
पार करावी वाटली नाही यमुना?
तू पाऊल उचलले असतेस
तरी तिने तुला वाट करून दिली असती
हे ठाऊक असतानाही
तू असा निरोप धाडावास?
कुणा एका करवी?
काय आडवं आलं ?
सुताचे जाऊन रेशमी झालेलं उत्तरीय की
मोरपीसाजागी आलेला मुकूट?

मीही त्याला धाडले माघारी
रिक्त हातांनी
म्हटलं, येऊ दे श्रीकृष्णाला साक्षात
राधेची मनधरणी करायला...
विचार म्हणावं
किती काळ तिष्ठली राधा
पुढ्यातून वाहणा-या यमुनेला!

सकाळची दूपार,
दुपारीची सायंकाळ झाली सख्या
न राहवून
मीच घातली उडी अन्
पार केली अस्वस्थततेची यमुना!
पण तिथे तुझ्या पाऊलखुणांखेरीज
माझ्या हाती काहीच आलं नाही ,
तू ही शेकडो
अस्वस्थ येरझा-या
घातल्यास का रे यमुनेच्या काठावर?

कशी वेडी मी?
कशी विसरले
गोकुळाला तू दिल्या होतास
बाळलीला करणा-या कान्हाच्या अभेद्य आठवणी!
मुत्सद्दी श्रीकृष्णाची सावलीही त्यावर नको
म्हणून आज
ऐलतीरीच थांबला होतास,
माझी वाट पाहत...

तुझ्या पाऊलखुणा
ओंजळीत भरून घेताना आठवलं
एकदा माझ्या शेल्याचं कौतुक करताना
म्हणाला होतास,
"मानवी स्वभावाचे कंगोरे फार अणुकूचीदार राधे..
जप. कधी अडकू नको देऊस याला त्यात! "
आज उधडला माझा शेला कान्हा,
त्याच कंगो-यात अडकून...
-बागेश्री

Monday, 14 January 2019

तुळजाभवानी

मी तुळजाभवानीला गेलते
कोलाहलाच्या दिशी
तिच्याच अंगणात
तीच अंगात येऊन घुमत व्हती
एक बाई
लोक येऊन नमस्कार घालून
चाल्लेते तिच्यासमोरून
बायांची तिला कुंकू लावायची झुंबड,
कपाळ माखून डोळ्यावर
उतरलीती लालिमा
......ती घुमत व्हती

इच्छापूर्त्ती दगड फिरत व्हता,
हो- नाही निकाल सांगत
पिचलेल्या मानसांच्या अपूर्ण मनोरथांचा..
बाप्ये बाया लोटांगण घालत घालत
देवळाला प्रदक्षिणा घालत व्हते
आणि भवानी गाभा-यात,
गाभा-याच्या अंधारात उभी एकाकी

मी तिला भेटले तवा
अपार गर्दी व्हती
सारे तान्हलेले
तिला पह्याला
मला वाटतेलं
मी ही इतक्या लांबून आले तवा
बोलील माझ्याशी दोन शब्द
हलले नाही
तिचे व्हटं
पर हसली गुढ, गेल्या येळसारखीच
मी म्हनलं
"बरं माय. येते पुढल्या येळी.."

ती घुमणारी गप पडलीती
दगडाला टेकून
मला वाटलेलं
तिच्या कानात जाऊन सांगावं
खोटी देवी का आणतीस अंगात
तुझ्या आत खरीखुरी शक्ती हाय तिला जागव
"अनुभूती" ची रक्षा करीत जिनं
महिषासूराला धाडलंतं यमसदनी
जिनं देली शिवाजीला पराकरमी तरवार
तिच्या दरबारी हायस तू.....

पर मलाच उलगलं की,
हिथं प्रत्येकाची आपली भाशा हये श्रद्धेची 
कोण्ही तिच्याशी कशी जोडावी नाळ
ह्ये ज्येचं त्येनं ठरवलं अहे...
त्येत कुनीच करू नये
ढवळाढवळ
ती सुद्दा कुठे करिती?
पर ती जी देवूळात उभी ठाकून 
मंद गूढ हासतेली
त्या ईश्वव्यापी हासण्याचा ठाव
लागंल का कदी 
कोण्हालाबी?
-बागेश्री

नॉस्टॅलजिक घमघमाट

.... पळत्या थंडीतलं उन अंगाला चटकेपर्यंत गच्चीत बसून नुकतेच धुतलेले केस वाळवत बसायचं! केसातून गालावर येणारे उन्हाचे कवडसे अनुभवत, शिकेकाई किंवा रिठ्याचा घमघमाट श्वासात भरून घेत निवांत बसलेले असताना "तिळपोळ्या झाल्यात बरंका गरमागरम" आईची हवीहवीशी हाक यायची आणि गच्चीवरून धावत सुटायचं! ही त्या दिवसांची गोष्ट... सक्काळीच स्नानादी आटोपून आई- काकू स्वयंपाकाला भिडलेल्या असायच्या. आमच्या घरी गावातले इतर नातेवाईक जेवायला जमणार असायचे. काकू सकाळीच मदतीला हजर झालेली असायची.. त्यांचे आटोपेपर्यंत आजीबाईनी देवापुढे मातीच्या लहान बोळक्यांतून, टहाळाचे दाणे, साखरेचे काटे उठलेले रंगबिरंगी तिळ, तिळाच्या रेवड्या सजवलेल्या असायच्या. मग तिळगुळाच्या पोळीचा नैवेद्य बाप्पाला झोकात दाखवला जायचा. हळू- हळू सारे जमले, आणि स्वयंपाकाच्या घमघमाटाने भूक चाळवली, की मिक्स भाजी- तर्रीदार भरली वांगी- बाजरीच्या भाक-या- गाजराचे काप- लोणी- ठेचा- मठ्ठा, आणि... तिळाच्या पोळ्या असा सरंजाम घेऊन, सगळी मंडळी आंडीमांडी घालून, एकत्र मिळून जेवणावर ताव मारायची! पहिला घास घेताच काकाला नेहमीप्रमाणे बुक्की मारून फोडलेला कांदा खाण्याची हुक्की यायची. मग घरातल्या शेंडेफळाला, "छोट्या, परडीतला कांदा आण की एक" अशी आज्ञा सुटायची. तेही उत्साही तुरूतुरू आज्ञापालन करायला जायचे. पुन्हा आपल्या जागी येऊन बसताना मात्र अशा खुबीने पाण्याचा तांब्या पालथा करायचे की काकाला कुठून याला कांदा आणायला सांगितला असे होऊन जाई. पाण्याचा असा गौप्यस्फोट होताच जो तो पटापट एका हाताने आपलं ताट दुस-या हाताने एखादं पातेलं घेऊन उभा रहायचा. छोट्याचा उद्धार करत पाणी पुसण्याचा कार्यक्रम साग्रसंगीत पार पडायचा. काकू "अहो लहान आहे ते, मुद्दाम नै केलं त्यानं. येरे इकडे" म्हणत त्याला जवळ घेऊन जेवायला बसायची. विस्कळीत झालेलं पुन्हा पदावर येत गमती- जमती करत पंगत रंगायची. गुळपोळी चिवडून झालेली बारक्यांची गँग खाली खेळायला उतरायची. त्यांच्या ताटातलं उष्टं त्यांच्या आया हळूच आपापल्या पानात घ्यायच्या. आता मात्र मोठ्यांच्या ख-या गप्पा रंगायच्या!! आई काकूच्या सकाळपासून झालेल्या दगदगीवर या गप्पांचा खरा उतारा असयाचा. एकमेकांना आग्रह करत यांचे चक्क तासभर जेवण चालायचे. ती मैफिल पाहण्याचा मोह मला कधीच सुटला नाही. मोठ्यांचे एक वेगळे रूपत्या पानावरच्या गप्पांमध्ये मी पाहिलेय. त्यांनी पाणी आणून दे, किंवा एखादी चटणीच आणून दे निमित्त करून मी तिथे रेंगाळायचे. मोठ्यांना असे रिलॅक्स असताना पहात रहायचे. त्यांच्या गप्पा कळत नसल्या तरी, या एकमेंकांमध्ये किती घट्ट प्रेम आहे, याची जाणिव आनंदी करायची. सणावाराला सारे जमून असे निवांत होताना पाहणे, म्हणजे सुख होतं. जेवणानंतर मागचे आवरतानाही, त्यांना बोलायला विषय पुरायचे नाहीत. एका विषयावरून दुस-या विषयावर काय सहज त्यांची गाडी घसरायची. बरं आई, आज्जी, काकू, वहिनी एका ट्रॅकवर बोलायचे तर बाबा, काका, दादा लोक दुस-या. तरीही एकाएकी त्यांचे ट्रॅक एकत्र येऊन सगळे अचानक एकाच विषयावर बोलू लागायचे. ही कला त्यांना कशी आत्मसात होती हे मला कधीच समजलं नाही. सगळी चकाचक आवरा आवर झाली, की खाली सतरंजी टाकून गप्पा आणखी टिपेला जायच्या. पान सुपारीचे डबे उघडत, भरल्या पोटी, कुणी कुठे, कुणी कुठे आडवे होत बोलत रहायचे. हळू हळू गप्पांचे आवाज दबत दबत घोरण्याचे सूर लागायचे. हे असं झाल्याशिवाय सण साजरा झाल्यासारखं वाटायचंच नाही. आईच्या उबेला मी ही सुशेगाद निजून जायचे. चारच्या फक्कड चहाला पुन्हा घरभर वर्दळ होऊन जायची. सणावाराची सुट्टी अशी भरगच्च पार पडायची.... आता एकत्र कुटुंबपद्धती नाही आणि कुणी कुणाकडे फारसे जातही नाहीत. सणवार ज्याच्या- त्याच्या घरी. एक कपल आणि त्यांचं मूल, एवढ्यातच सण साजरे. त्यातही चटकन जेवून, पटकन आवरून जो तो आपला मोबाईल घेऊन बसतो. पूर्वी खरे तर मने इतकी मोठी होती की उणदुणं मिटवायला, संक्रातीची वगैरेही वाट पहावी लागायची नाही. आता माणसंच माणसांपुढे क्वचित येतात. त्यांचे राग- लोभही व्हर्चुअल! त्यात सणावाराला व्हॉट्सअ‍ॅपवर शुभेच्छा पाठवल्या की, "मी दिल्या बाबा शुभेच्छा" हे समाधान पांघरून, दिक्षित- दिवेकर डाएट नावाखाली इन-मिन अर्धी तिळपोळी खाऊन दुपारी गाढ निजून जायला होते...... दररोजच्या जगण्यात बदलत काहीच नाही आणि मागे पाहिल्यावर सगळंच बदललेलं असतं. तव्यावरच्या तिळाच्या पोळीला सुटलेल्या नॉस्टॅलजिक घमघमाटाने मला जुन्या दिवसात चक्कर मारून आणली, एवढं मात्र खरं! -बागेश्री


Monday, 7 January 2019

हक्काचा डोह

असा एक डोह
असते मी शोधत
डुंबता येईल 
ज्यात मला,
माझ्या अस्तित्वासकट...

मी भिरभिरतेय
शोधतेय
कधी कुणाच्या अपार करुणेत,
कधी कुणाच्या निस्पृह भावनेत
कुणाच्या अर्थात,
कुणाच्या परमार्थात
कुणाच्या असण्यात,
कुणाच्या नसण्यात
कुणाच्या अंगणात किंवा
कुणाच्या भंगण्यात
एखाद्याच्या जाणिवेत
माझ्या तरी नेणिवेत
पण मला सापडतच नाही
एकही डोह,
जो सामावून घेईल आहे तसा
एकही प्रश्न न करता आहे की, तू कोण... तू कसा?

वाटलं होतं,
घर सुटल्यावाचून
मीपण तुटल्यावाचून
होणार नाही सार्थ
लाभणार नाही अर्थ
ह्या जगण्याला...
तेव्हापासून आजवर
फिरुन झाले जगभर
नाही लागली हाती
हक्काची कुठली नाती..

म्हणून सांगते
एकदा गवसल्यावर
सोडूच नये,
हक्काच्या डोहांचे मन
मोडूच नये
कारण...
तेच असतात
जे मनसोक्त डुंबू देतात,
पण बुडू देत नाहीत!
-बागेश्री

Thursday, 27 December 2018

रडू

बायी निसती हमसू नको,
रडून घे एकवार
स्वत:च्या पुरात
वाहून जाईस्तोवर...

तुझं झिजणं
मनाला मारून जगणं
आणि त्येच्यामुळं धुमसणं
समजून घेणारं हे जग नही
ह्ये युगानयुगे हिथे येऊन बी समजलं
न्हाई तुले?
तुझं दुख त्रास त्रागा झाकून
सुहास्य सुवदनीच
हवी असतीस तू
या जगाले..
तुला तुझ्या आतून
येका बायीबगेर
दुसरं कुनी वळकू
शकत नसतंय
पर बायी तुझ्या सखीला तरी तू
किती जवळ येऊ देतीस?
म्हनून म्हणतले
तुझ्यापाशी येकच मार्ग असतोय
एकवार स्वतःतून वाहून जायाचा
लख्ख होऊन जायाचा
मग आपसूक
येतलं
तुज्या व्हटावर हसू
तुलाबी आवडणारं अन् तुझ्या सग्यासोय-यास्नीबी


Wednesday, 26 December 2018

मैत्र

कोवळसं ऊन आकाशातून झेपावत पृथ्वीकडे येतंय. त्याची ओढ आदिम आहे. ते हात पाय ताणून देत सांडल्यासारखं सर्वत्र पसरेल. झाडं, पानं, फुलं, नदी, नाले, घर दार खिडक्यांमधून हवे तिथे शिरेल. हक्काने शिरकाव करेल, जागा मिळेल तिथे पडून राहील. आडोसा आला की सावली होईल. त्याला आगंतुकपणाचं वावडं नाही..
      फार पूर्वी आपलं इथे अस्तित्वही नसल्यापासून ते असं तिच्या ओढीनं आभाळ कापत झेपावत उतरतं. आपल्या सिमेंटच्या, काळ्या धुराच्या रेघोट्या तिच्यावर उमटण्याआधीपासूनचं त्यांचं मैत्र असं सोनसळी घट्ट आहे.
         रोज भल्या पहाटे कावळ्यांनी जागं केल्यापासून ती त्याची वाट पाहते. गारठलेला पाण्याचा पदर लपेटून त्याच्या स्वागताला सज्ज होते. तो तिचा आकाशीचा दूत आहे. भरती ओहोटीकरता चंद्राला दमात घेतो. सागराची वाफ करून तिच्याकरता पावसाची सोय करतो. तिला हसरी खेळकर पाहून त्याचं चित्त खुलतं. तीही त्याचा तापट स्वभाव चांगला सांभाळून घेते. कधी त्याचं काही चुकलं तरी त्याला पोटाशी घेते.
         मी रोज सकाळी चालायला जाताना त्यांची ही भेट बघते. कोवळं कोवळं हितगुज त्यांच्या नकळत ऐकते. मग मला वाटतं आपण इथे असू, आपण इथे नसू ते मात्र एकमेकांकरता सदैव असणार आहेत. त्यांचे नियम चुकत नाहीत, भेटीच्या वेळा मागे पुढे होतात बरेचदा, पण रोजची भेट काही केल्या चुकत नाही. कधी आभाळाने सत्याग्रह केला आणि त्याला झाकून टाकलं तर ढगाला कुठूनतरी छिद्र करून ते एखाद्या किरणाला निरोप देऊन घाईने तिच्याकडे धाडतं. 'मी आहे बरं, काळजी करू नकोस. हे वरचं निस्तरलं की आलोच.' तिलाही सवयीने सर्व ठाऊक असलं तरी एवढ्या निरोपाने तिची तगमग थांबते.
      शेवटी ती त्याची ऊर्जा आहे. तो तिची ऊब. हे मैत्र अनादी काल असंच चमचमत राहो....
-बागेश्री

लोटांगण


दर्शन घेऊन मंदिरात चार क्षण टेकल्यावर आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करत होते. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी. ती व्यक्त करण्याची पद्धतही वेगळी. आणि त्यामुळेच नमस्काराचे प्रकार वेगवेगळे. कुणी साधाच नमस्कार. कुणी दोन्ही हातांची बोटे एकमेकांत घट्ट गुंफून काही पुटपुटतंय. कुणी चार वेळा दोन्ही गालाला आबा-तोबा करून घेत छातीवर हात घट्ट रोवून नमस्कार पोचता करतोय. कुणी गुडघ्यावर येऊन त्यांच्यापुढे नाक घासतोय. थोडक्यात देवत्वाला जोडून घेण्याची प्रत्येकाची पद्धत आगळी. परंतु लोटांगण घालणाऱ्यांचं मला सगळ्यात जास्त कौतुक आहे. ती सपशेल शरणागती.
लोटांगणाने एकतर आपण देवाच्या मूर्तीपुढे खुजे होऊन जातो दुसरं म्हणजे मागणा-याने ताठपणा त्यागून लीन झाल्याशिवाय देवाचा कान जिंकता येत नाही.
या दरम्यान हे ही घडतं, की तेवढ्यापुरतं जेव्हा आपण जमिनीला टेकतो तेव्हा डोक्यावरलं, खांद्यावरलं अपेक्षांचं, कर्तव्यांचं, जबाबदारीचं ओझं भुईला टेकतं नि आपण पार हलके होऊन जातो.
देवळातली सकारात्मकता आपल्या आत भरून घेऊन नव्या ऊर्जेने जगण्याला भिडण्याची किमया त्या एका लोटांगणाने घडते.
-बागेश्री

स्वोच्चता

घर सफाई करताना
वाटतेलं
एकवार फिरवावे नेत्र
आपल्या दिशेने आत..
त्या घराची स्वोच्चता कधी केलती
 जल्मापासून?

केवढाली स्वार्थाची जळमटं
गुतलेते किडे त्यात
आपूनच योजून गुतवलेले
आन परमार्थाची
निसती धूळ.
देवघरबी दिसतेलं
धूळ खात पडलेलं
कधी सोताच्या आत येऊन
लावला नही दीप
मनाच्या गाभा-यात..
कसं उजळावं
अंतःकरण?
पर आवडलीती
मला ती जागा
शांत कशी कुनास ठाऊक
आणि गार बी
बाहेरचा अंगार अजून डसलेला नही ह्या जागेला

मी निर्धारानं
सोच्च करायला घेतलंय समदं
दीप उजळल्याबिगर जायची नही इथून
आज हिथंच रहावं म्हणते
-बागेश्री

गुतवळ

मला कळतेलं
कुनी नसतंय कुनाचं
जलमापासून जाईपरयंत
सगळे इनतात धागे
आपल्याशी
सोयर असल्यापरमाने.
पर प्रत्येकाला हवं असतंय,
आपल्यातलं काहीतरी...

या धाग्यांची गुतवळ

साम्हाळत
कुनाकुनाचं वझं पेलत
जगतो आपन,
आपल्याला वाटू लागते
आपणच ग्रेट
सगळ्याईले घेतलंय
सम्हाळून
पर जाताने येते ध्यानात,
आपलाबी एक धागा व्हता
कुनाच्यातरी गुतवळीत....
-बागेश्री

Friday, 21 December 2018

विसर्ग

तुले सांगते
ज्या लोकायचे आयुष्य
भिरकावलेले असते
या जगाच्या पसाऱ्यात
ज्येंना पशुपक्षी तर भितेत
त्ये मानूस ह्येत म्हनून,
पर मानूस वागवत नही
मानसापरमाने,
त्येला ईचारावा
जगण्याचा अर्थ
कारण,
फक्त त्येला उलगलेला असतोय,
दुःखामधला इसर्ग अन्
वेदनेच्या काना मात्रा !
-बागेश्री

Thursday, 13 December 2018

आज

एक गोष्ट वाचली होती फार पूर्वी. घराची स्थिती साधारण असलेली एक आई स्वतःची हौस मौज मारून भविष्याला जरा हातभार म्हणून वाचवलेले पैसे अंधाऱ्या पोटमाळ्याच्या फडताळात ठेवायची. स्टीलच्या डब्यात. गपचूप. एकेवर्षी फार फार नड लागली तसा तिने डबा उघडला तर तिच्या हाती नोटांचा भुसा आला. वाळवी लागलेली.
वाटलं,
आपण काय वेगळं करतो?
हाती आलेला आजचा क्षण अमुक एका टप्प्यानंतर जगूया. अमुक यश मिळाल्यानंतर, तमुक गोष्ट झाल्यानंतर, उत्कर्षाच्या, इच्छापूर्तीनंतरच्या टप्प्यानंतर असं म्हणत फडतळातल्या डब्यात साठवत जातो. आणि आयुष्याच्या एखाद्या क्षणी जेव्हा तो डबा उघडतो तेव्हा त्याला काळाची वाळवी लागलेली असते. हाती 'न जगलेल्या क्षणांचा' भुसा येतो नुसता.
      "आज" साठवता येत नाही. तो वसूल जगून घेता येतो फक्त!
-बागेश्री

Tuesday, 4 December 2018

मोरपीस

मी अजूनही जिवंत ठेवल्या आहेत
त्या सर्व जागा
जिथे तुझ्या स्पर्शांची ओळख
रेंगाळली होती कधी काळी..
गाईच्या घंटेपासून ते
रानाच्या पायवाटेवर
उमटत गेलेल्या तुझ्या
हाता- पावलांच्या ठशापर्यंत....
तुझ्या पाव्यापासून,
कुंजवनात तू भान हरपून डोलताना
तुझ्या अंगाखांद्यावरुन
टपटपून गेलेल्या आम्रमोहोराच्या
बहरापर्यंतचे सारे सारे काही
मी जिवंत ठेवले आहे,
पुन्हा पुन्हा त्या जागांना भेट देऊन
माझ्या मनात तुला जागते ठेवून..
इतकेच काय तर
कधीतरी केसात मोरपीस माळून
कान्हाच झालेय मी
आणि तुझ्या गोपिकांनाही
पडलीये भूल, जणू काही साक्षात
तूच आला आहेस
उभा आहे त्यांचा गोप, कृष्ण, मुकूंद, प्राणसखा
पुन्हा त्यांच्यासमोर!
त्यांनी धरलाय फेर माझ्याभोवती
इतकी तुझ्या रुपात समरूप होऊन
मी घेतलाय पदन्यास कान्हा,
विसरून आपल्यातलं अंतर
माझ्यातून तू उमलून आला आहेस,
कैक वेळा!
तेच मोरपीस रात्री
उशाशी घेऊन नकळत मोकळा होतो बांध
झिरपत राहतात डोळे
माझ्याच चकव्यात अशी वारंवार मी
बुडत सावरत राहते म्हणून...
पण मला सांग, एकदाच सांग
त्या त्या वेळी दूर तिकडे इंद्रप्रस्थात
तुझ्या मोरपिसालाही ओल येते का रे?
-बागेश्री

Sunday, 2 December 2018

सुवर्णकण

कधी कधी देव अशा देवत्वाला जन्माला घालतो की त्याचं सारं आयुष्य आत्मबोध आणि आत्मशोधात व्यतित होतं. जीवन आणि आयुष्य यातील भेद न कळता ते देवत्व स्वतःत मिटलेलं, स्वतःपुरतंच उगवून स्वतःत विझून जातं.

.... आणि कधी देव अशा देवत्वाला निपजतो की जणू आत्मबोध संगतीने घेऊन तो या जीवनात प्रकटला. त्याच्या स्पर्शाचे कण सुद्धा तुमच्या जाणीवा जागृत करायला पुरेसे ठरतात. अशा देवत्वाच्या आसपास सामान्य ढीगांनी पेरलेले असतात, आपापला आत्मोद्धार करून घेण्याच्या हेतूने. असे देवत्व आसपास आढळले जे आत्मप्रगती साधून आपल्या वाणीने, ज्ञानाने, बोधाने तुम्हाला समृद्ध करू इच्छित असेल तर ते मोकळ्या हाताने, स्वच्छ मनाने, खुल्या हृदयाने स्वीकारावं. फार कमी नशिबवानांच्या हाती हे सुवर्णकण येतात.
-बागेश्री

Thursday, 29 November 2018

कधी असे तर, कधी तसे रे..

उन्हात रणरण चालत जाता
वाटेवरल्या उभ्या मोडक्या
मंदीराच्या त्या वळणावर
कधी मंदशी, झुळुक होऊन

पाणी पाणी जीव होताना
कुठून अचानक येतो कोणी
ज्याची माझी ओळख नाही
जातो नीर माडाचे देऊन

मनात येते गाणे गावे
शब्द मिळेना सूरही नाही
तेव्हा अवचित आली कविता
आकाशाचे गाणे होऊन

चिंब जागत्या कृर रात्रीचा
डंख काळसर डोळा रुतता
दूर अंधूक कंदिल होउन
होतास तिथे, मिणमिण करता...
तुला वाटते, भेट आपली
उशिरा झाली फार फार पण
जगून गेले आहे तुजसव
अनेकवेळा, अनेक क्षण मी..
कधी असे तर, कधी तसे रे !!
-बागेश्री

Wednesday, 28 November 2018

कोण बरं बसलं होतं?

मला आठवत नाही नक्की काय तयार करत होतो पण आपल्या दोघांचेही हात मातीने प्रचंड बरबटलेले होते आणि त्या अवस्थेत कडकडून तहान लागली होती. भर दुपारची वेळ. तहानेवर काय उपाय करावा या विवंचनेत असताना, तुझ्या सुपीक डोक्यात "घरीच जाऊत काय?" असा विचार आला. "मार खायचा की काय?" ह्या माझ्या उत्तराने तू गप झालास.
खरं तर आपल्याला दुपारचे जेवू खाऊ घालून आई- मामी घरातले आवरून नुकत्याच लवंडल्या होत्या, त्यांच्या गप्पा सरून घोरण्याचा सूर लागताच आपण हळूच कडी सरकवून घरातून पोबारा केला होता."दुपारच्या उन्हात खेळायचं नाही. घोळाणा फुटतोय. गप घरात बसायचं. घरातच केरम गिरम खेळा काय ते" अशी कडक सूचना असताना आपण बाहेर येऊन मातीत खेळायचं साहस केल्यावर, तू मला विचारत होतास, घरी जायचं का माठात हात बुचकळायला? तू लहान म्हणून सुटला असतास रे. पण एका थपडेत माझा घोळाणा फुटला असता त्याचं काय?
..एवढ्यात धप्पं अशा आवाजाने आपण दचकलो (चोर सावध असतात नै का) पाहिलं तर बाजूला, अगदी आपल्या बाजूला एक आंबा पडला होता. तू लगबगीने तो उचललास. जिथे आपटला तिथे आंब्याच्या डोक्याला चांगलाच मार बसलेला. ती जागा हेरत तू मातकटलेल्या हाताने तो सोललास आणि ही रसरशीत धार. माझ्या तोंडात धरलीस. हनुवटी, फ्रॉक यांच्यासकट मलाही जरासा गोडगिट्टं रस मिळाला. "पुरे मला. तू पी की" असे मी म्हणता तू उरला सुरला सोलून खाल्लास. कोयीचा गर मातीसकट मटकावला आपण. अहाहा. (आताच्या महागातल्या महाग हापूसाला ती चव नाही.) तहान भागून आपण पुन्हा रमलो. झाडाच्या सावलीत, चिखल मातीला आंब्याच्या हाताने भिडलो.
मला आजही प्रश्न पडतो, आपल्याला पहात तेव्हा त्या झाडावर कोण बरं बसलं होतं?
-बागेश्री

Sunday, 18 November 2018

प्रवाह

चकाकत्या प्रवाहाचं आकर्षण
ओढ देतं आणि हलकेच पाय
आत सोडावेसे वाटतात....
नवे भुलावे, साद घालतात
अनोळखी चैतन्य अंगाला भीडतं
शरीराचा द्रोण होतो नि
प्रवाह नेईल तिथे
प्रवाह नेईल तसा
सुरू होतो अखंड प्रवास
कधी असा, कधी तसा...!

काठ, काठावरली माती
तिची हाक तिचा स्पर्श
कधीच विसरतात पाय,
फसव्या प्रवाहालाच लागतात समजू
आपला बाप, आपली माय...!

काठावरून निसटलेली,
प्रवाहामध्ये भरकटलेली
अशी कित्येक माणसं
तुम्हीही पाहिली असतील ना?
वेळीच अशा द्रोणाला
आणून काठावरती
द्यावी मिळवून त्याला
त्याची माय, त्याची माती!
-बागेश्री

Saturday, 6 October 2018

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

मंटो असो वा मनवर. एक गोष्ट समाजाने कायम ठेवलीय. तुमच्याकडे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहेच, परंतु लेखक/ कवी म्हणवून घेताना एक जबाबदारीही आहे. तुमच्या लेखणीच्या प्रवाहात आजचा समाज प्रतिबिंबित होत असला तरी "गढूळ" आशय लोकांपर्यत पोहोचवताना लेखणी गढूळली जाणार नाही, ही काळजी घेत व्यक्त होण्याची जबाबदारी.

       लेखकाने कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील असू नये. त्याला जात, धर्म, प्रांत, नसावी. त्याची दोनच आयुधं. एक नजर, दुसरी लेखणी. दिसणारं आहे तसं मांडणं हे त्याला मिळालेलं स्वातंत्र्य. त्या स्वातंत्र्याला जबाबदारीची झालर आहेच. ती काल- आज- उद्या कधीच उसवून चालणार नाही. हे विसरता नये.
-बागेश्री

Wednesday, 3 October 2018

जाणिवेची दलदल

नाती वरवर जितकी साधी सोपी वाटतात. तितकी आत गुंतागुंतीची असतात. हे अनेकदा अनुभवायला येते. घट्ट विण एकाएकी उसवलेली दिसते. आपण आश्चर्य करतो. आपल्याला कायम वरून घट्ट वाटत/ दिसत आलेले असते नाते, मग ताट्कन कसे उसवले? यावर विचार करत राहिले. जितका सखोल विचार केला, तितकी गुंतागुंतीच्या निबिड अरण्यात शिरत गेले. ताड ताड चालत राहिले. कुठल्याशा क्षणी दलदलीत पाय पडला. भुलाव्याची दलदल. देखाव्याची दलदल. आकलन झालं. हेच ते मूळ. जमिनीसारखी भासणारी, पोटात मात्र भुसभूशीत असणारी, दलदल! 
                   आयुष्याचा भला मोठा टप्पा पार करायचाय तेव्हा, नाती सांभाळावीच लागतात. या एका समीकरणावर आपण जगण्याचा डोलारा उभा करतो. नाती जोडली जाताना ती आपलीशी व्हावी, आयुष्यभर टिकावी म्हणून आपण काय करत नाही? स्वतःला विचारण्याजोगा प्रश्न आहे हा. नाते आपले आहे, हे जाणवेपर्यंत आपण त्या माणसाच्या मनाला भावेल अशी प्रत्येक गोष्ट करतो. त्यातल्या कैक आपल्याला पटत नसतात. पण जी व्यक्ती आपल्याला हवीशी त्या व्यक्तीकरता आपण आपले मन मारतो. प्रसंगी आवडी. प्रसंगी इच्छा. प्रसंगी तत्त्व. जे जे दाबून टाकतो. त्याची दलदल तयार होत असते. आत आत. कधीतरी ते नाते स्वीकृती देते. म्हणजे तसे ते म्हणते. पण बरेचदा असे होते की, त्या नात्याने स्वीकृती दिली तरी आपल्या आतून एक जाणीव येत राहते. समथिंग इज "स्टील" मिसिंग. नाते आपले आहे, हा फक्त भास आपल्याला देऊ केलाय. असा आतला आवाज येतो. पण त्या जाणिवेचं आपण काय करतो. तिची कॉलर पकडतो. तिला दलदलीत टाकतो. नात्यासाठी झटणे मात्र सुटत नाही. थांबत नाही. एकातून एक अशी नात्यांची गुंफण अविरत करत जातो. 
                   कधीतरी प्रसंग येतो. परिक्षा होतेच. या जगण्याची ही मोठी गंमत आहे. डोळे उघडणारी वीज तो वर बसलेला नक्की पाडून जातो. आणि काय त्या वीजेचे तेज. सगळे लख्ख दिसू लागते. आतला आवाज नव्हताच खोटा. नाती उघडी पडतात. आपण त्यांना धरून ठेवली तो आपला अट्टहास होता, ही जाणीव देऊन लोपते ती वीज. आपण दिपलेले डोळे उघडतो तेव्हा दलदलीत उभे असतो. धसत धसत. आता स्व- हिमतीवरच बाहेर यावे लागते. पोळून निघाल्यावर सावध पावले पडण्याची सोय असते ही.
               आपले आधार विचार करून बांधावेत. अधेमधे तपासून पहावेत. मनाचा तळ स्वच्छ राखायला मदत होते. आतल्या आवाजाशी मैत्री करावी. त्याच्या ताकदीवर लांबचा पल्ला गाठता येतो.
-बागेश्री

Thursday, 27 September 2018

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं

१.

दरवर्षी सर्व तुकड्यांमधून पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल शाळा पुढील वर्षाच्या सातही विषयांची पाठ्यपुस्तके, सात २०० पानी, सात १०० पानी वह्या बक्षीस म्हणून देत असे. तिच्या छोट्या हातात ते बक्षीस मावायचंही नाही. वर्ष बदलायचं पण हिचा पहिला नंबर चुकायचा नाही.  
तिच्या बाबांनी सांगून ठेवल्याप्रमाणे शिंदे सर एक मुलगी हेरून ठेवायचे. जिला शाळेचा खर्च परवडणारा नसायचा. पहिला क्रमांकाचा गौरव मोजून पाच मिनिटे मिरवला की ते बक्षीस सर म्हणतील त्या आपल्या वर्गमैत्रिणीला देऊन ही बाबांचे बोट धरून घरी यायची.
               एकेवर्षी दुपारी लेक निजल्यावर कौतुकाने तिच्या चेह-यावर हात फिरवून आई म्हणाली, एकदाही पोरीला बक्षीस घरी आणू देत नाहीत. बाबा म्हणाले, अगं हिचा शाळा खर्च मी करू शकतो, देवाने तेवढं दिलंय आपल्याला. तू एकदा नव्या को-या पुस्तकांना हातात धरणारी मुलं बघायला हवीस. त्यांचा फुललेला चेहरा पहायला हवास. शिवाय आपल्या लेकीला आतापासून कळायला हवं. गरजेपेक्षा अधिक मिळालं की त्याची हाव नाही धरायची. ते सत्पात्री दान करायचं.

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं
---------------******-----------------
२.

तो इंजिनिअर झाला. रग्गड कमावू लागला. त्याच्या हातात कला होती. कागदाला पेन्सिल टेकवली की उत्तमातून उत्तम चित्रे काढी. प्रमाणबद्धता, रंग, सौंदर्य अव्वल उतरे. तो कधीही चित्रकला शिकला नव्हता. पण त्याची चित्रे भल्याभल्यांना आवडून जात. लोकांना वाटे जादू आहे बोटांत. कुणीही त्याच्या घरी आले,  की भारंभार चित्रातले एखादे बेधडक उचलून "हे मी नेऊ?' विचारून घेऊनही जात. त्याचे एक्सिबिशन खच्चून भरे. दोन वर्षाकाठी एखादे प्रदर्शन पण लोक कौतुकाने येऊन चित्रे विकत घेत. आलेला सगळा पैसा त्याने कधी कुणाला कधी कुणाला वाटून टाकला. कारण विचारल्यावर सांगायचा, आई म्हणायची, तू इंजिनिअरिंग शिकून नव्हता आलेलास. खपलास, जागलास, मेहनत केलीस तेव्हा कुठे ती पदवी मिळाली. पदवीने पुरेसा पैसा दिला. चित्रकला मात्र देवाच्या घरून घेऊन आलास. ते तुझं मिळकतीचं नाही, ते तुझ्या आनंदाचं साधन. त्यातून मिळालेलं, ठेऊन काय करशील?

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं
---------------******-----------------
३.

ती लहान भावावर जवळजवळ खेकसत म्हणाली, तू पहिले तुझ्या अभ्यासाचं बघ! दरवर्षी कमी मार्क्स. परिक्षेच्या काळात रायटर म्हणून जातोस. आधी स्वतः उत्तम मार्क मिळव मग दुस-यांचा रायटर हो. त्याने गुमान मान खाली घातली. अभ्यास करत बसला. ताई निजल्यावर अलार्म बदलून ५ चा केला. पेपरच्या आधी अर्धातास हा सेंटरवर पोचला नाही की, तो याची वाट पहात सैरभैर होतो. ब्रेललिपीवरची त्याची बोटे टेन्शनने थरथरतात. ऐनवेळी रायटर आलाच नाही तर? या विचाराने केलेला अभ्यास विसरायला होतो. हे आता ह्याला ठाऊक झालं होतं. दरवर्षी कुणा नव्या अंध विद्यार्थ्याचा हा रायटर म्हणून जायचा. याला स्वतःला ४ मार्क कमी आले तरी समाधान खूप मिळायचं. त्याने ताईला एक दोन वेळेस सांगून पाहिलं, तू ही करून पहा. आपले डोळे फक्त ३ तास कुणासाठी वापरल्याने त्याचा विषय निघतो, तो वरच्या वर्गात जातो तेव्हा काय भारी वाटतं एकदा अनुभवून पहा..

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं
-बागेश्री


  

Friday, 21 September 2018

मौन

मौनाच्या जंगलात
झाडे मौनाची
फुले मौनाची
मौनाच्या तळ्याला
चवही मौनाचीच...
उडालाच एखादा चुकार पक्षी
फडफड करत तर,
शांततेवर उमटणारा
ओरखडाही
मौनाचाच!

पायवाटा, कवडसे
विझली पालवी
फुलल्या वेली
उगवतीला, मावळतीला
सा-या सा-यांना
मौन डसलेले,
कडकडून
ग्रासलेले..

दोन माणसांत मौनाचे
हे असे जंगल पसरते तेव्हा
आशेला हळू हळू लागणारी
वाळवीही,
मौनाचीच!

-बागेश्री

Sunday, 16 September 2018

खरा प्रवास

फोलपटासारखे
एक एक मुखवटे
उतरवून एखादा माणूस
उघडा बोडका होतो
मुखवट्यांची सवय झालेली
त्याची माणसं मात्र
त्या ओक्या बोक्या चेहऱ्याकडे
फार पाहू शकत नाहीत

ज्यांच्यासाठी मुखवटे उतरवले
तेच ओळख देईनासे होतात..
आणि मग सुरू होतो
खरा प्रवास
स्वतःच्या दिशेने,
स्वतःकरता
मुखवट्यांशिवाय...
-बागेश्री

Friday, 14 September 2018

Happy Engineers Day!

वयाच्या अगदी नाजूक काळात रुक्षातील रुक्ष विषय घेऊन, गळ्यात ऍपरन बांधून लोखंडांच्या तुकड्याना फाईलने घासून तास न् तास आकार देत (बोटे तासली जाईस्तोवर) कारपेंटरी करत, वेल्डिंग करत वर्कशॉपमध्ये घाम गाळायचा. तोपर्यंत तुम्ही घरात कधी इकडची काडी तिकडे केलेली नसते. तो भाग अलाहिदा. बरं तुटपुंज्या १० मिनिटांच्या ब्रेकमध्ये धावत जाऊन कॅन्टीन मधील २.५ रुपयात फोडणीचे पोहे अन् पन्नास पैसे कटींगचा चहा उडवून पुन्हा केमेस्ट्री लॅबमध्ये धाव घ्यायची. पुढचे अनेक तास बॉंडिंगचा अभ्यास करत घालवायचे (त्या वयात कसले बॉंड अभ्यासायचे तर म्हणे, उग्र वासांच्या रसायनांचे!!)

जगात घडणाऱ्या सगळ्या लहान मोठ्या गोष्टींमागचं विज्ञान कळू लागतं. वास्तवाच्या खूप जवळ जाऊ लागतो आणि सगळ्यातली नवलाई संपून जाते. (टॉम & जेरी यांचं मेकिंग कळलं की त्यातली गंमत जशी संपून जाते ना तसं) 4 वर्षांत 40 विषय. वर्षागणिक रुक्ष होणारे. गणित, मेकॅनिक्स, इ. डी. तर दरवर्षी अनेकांना चाळणी लावायला बसलेले. ते शिकवणारे शिक्षकही त्याच त्या विषयात राहून रखरखीत कोरडेठक्क झालेले. एकच भाव. बोर्डावर खरडतोय झेपलं तर शिका !

मजल दरमजल करत एकदाची काळ्या तु-याची टोपी आणि काळा डगला अंगावर येतो आणि "हु-र्यो" करत डिग्री हवेत उंचावून झेलली जाते! "इंजिनिअर" असा ठप्पा बसताना चार वर्षातली अथक मेहनत आठवून आपण नकळतच आयुष्याप्रती बेदरकार झाल्याचं ध्यानात येतं.
   अनेकांना वाटतं इंजिनिअर म्हणजे वागण्या बोलण्यात फ्री अन् रुक्ष माणसं (अहो पण त्यांनी अभ्यासलेले विषय पहा!!)

पण एक आहे. इंजिनिअरींग कुठल्याही अडचणींतून मार्ग काढण्याचा जबरदस्त दृष्टिकोन देऊन जाते. हार पत्करायचीच नाही लढत रहायचं कधी ना कधी यश येणारच. कुठल्याही गुंत्याच्या तळाशी जायची वृत्ती, तिथून तो सोडवत आणायचा. गुंता सुटेस्तोवर गुंडाळं खाली ठेवायचं नाही ही चिकाटी. समोर जे आहे ते कसे बनलंय, ते असं आहे तर ते असंच का आहे याची चिकित्सा. त्यामुळे अनेक कॉर्पोरेट कंपनीमध्ये इंजिनिअर हवे असतात.

बरेच इंजिनिअर्स शिकून त्या त्या क्षेत्रांत आज कार्यरत नसतीलही पण मला त्यांना हेच सांगायचंय. इंजिनिअरींगने दिलेला दृष्टीकोन, चिकाटी, चिकित्सा रोजच्या जगण्याला, करत असू त्या कामाला नक्की वेगळं रूप देते. You definitely make a difference!

Happy Engineerins Day!
-बागेश्री

Tuesday, 11 September 2018

मी इथेच होतो राधे

सोडवी स्वतःशी राधा
जगण्याची अवघड कोडी
उतरवून प्राणावरली
देहाची अवजड बेडी


ती शोधीत कान्हा जाते
उसवून देहाचे अस्तर
अन गोकुळ पिंजून येते
माघारी परि निरूत्तर
हे रोजच घडते राधा
फिरुनी देहातच शिरते
अस्तर अंगाभोवताली
होते तैसेची विणते..


जरि निपचित भासे राधा
परि धुमसे उरी निरंतर
सुटता सुटे ना कोडे
मिळता मिळे ना उत्तर!
का कान्हा गवसत नाही
अन् शोधही संपत नाही
मी दमून अवघी गेले
तो इतके जाणत नाही?


आसवातूनी राधेच्या
मग कान्हा झिरपत राही
"मी इथेच होतो राधे,
तू आत पाहिले नाही
तू आत पाहिले नाही..."
-बागेश्री

Thursday, 6 September 2018

उत्तर

कान्हा,
तू जनपद प्रवासाला निघालास तेव्हा
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर
पाहिली मी आशा
की, तुझी भेट होत राहील..
ज्या गोकुळाने
तुझ्या बाललीला पाहिल्या
त्या गोकुळाशी तुझी नाळ
जोडून राहील
त्या आशेला
खोट्या आश्वासनाचे उत्तर देत गेले
तुझे भावगर्भ डोळे
पण, कान्हा
मला खात्री होत गेली
की आता नाही!
पुन्हा ही नजर
नाही उतरणार
माझ्यात खोल थेट
ही शेवटची,
शेवटचीच भेट..
त्या प्रेरणेला
प्रमाण मानून
अधीर होऊन
बसले विचारून
"मी येऊ? येऊ मी, तुझ्यासोबत?"
तुझ्या उत्तरावर मुकुंदा
माझा उधळलेला संसार
उरलेलं आयुष्य
टाकले मी सोपवून
घुमले तुझे उत्तर
प्रतिप्रश्न होऊन,
"काय ओळख देऊ राधे, काय म्हणून नेऊ?"
कुंजवनातले लक्ष प्रहर
माझ्यासाठी आळवले
वेणूचे आर्त स्वर
एकांत समयी आपल्यावर
बरसणारा आम्रमोहर
यापैकी कुणी कुणीच नाही उभे पुराव्याला
जिथे तुलाच हा प्रश्न पडला
तिथे द्यावे उत्तर कुणी कुणाला
की, मी,
मी तुझी आहे कोण??

माझी सैरभैर अवस्था पाहून
त्वरेने घेतलेस सावरून..
"अंतर पडले कितीही तरी
तू दिलेली ही वैजयंतीमाला राधे,
वागवीन मी माझ्या उरी.."
मी हसले..
समाधानाने हसले कान्हा
त्याच फुलांचा
निःस्वार्थ सुगंध
मिळवून देणार होते
तुझे तुला उत्तर,
विरह दुःखाने
करून तुला कातर!

-बागेश्री

Wednesday, 29 August 2018

घाव

अस्तित्वावर घाव पडल्यावर, नाती, त्यांचा घट्टपणा, आजवर कुणी कुणाला किती न काय दिलेय इत्यादी अनेक गोष्टींची बेरीज, वजाबाकी क्षणार्धात "शून्य" अशी येते.
         फांद्यावरचे घाव सोसता येतात, तिथे पुनर्निर्मितीची शक्यता असते. मुळावर बसणारा घाव, शेवटचाच.
-बागेश्री

Tuesday, 14 August 2018

एक असा पाऊस

एक असा पाऊस
जो धुवून नेतो
आपल्यासंगे
यश अपयश
आनंद दुःख
साठवलेली
कमावलेली
सारी जमा पुंजी
नी करून टाकतो लख्ख
सगळं काही

एक असा पाऊस
जो रिपरिप रिपरिप
पडतच राहतो
अस्तित्वाला ओल येईस्तोवर
रोजचं आयुष्य
सादळून जाईस्तोवर
घरात सरपण तर असतं
पण ओलं जळत नसतं

आयुष्यातही
झंझावातासारखी
सर येऊन गेलेली परवडते
लख्ख झाल्यावर निदान
नवा डाव मांडता येतो
नाहीतर,
रिपरिपीने फक्त चिखल होतो

-बागेश्री

Sunday, 22 July 2018

एकटेपणा

एकटेपणा चिवट असतो
आत आत झिरपत जातो
थरावर थर
देऊन बसतो...
त्याला रंग असतो का?
त्याला रूप असते का?
... ठाऊक नाही!
एवढंच समजलंय
तो ज्या क्षणी उसळी घेतो
दिवसातली कुठलीही वेळ
सायंकाळ होऊन जाते

-बागेश्री

Tuesday, 17 July 2018

Detox

दरी डोंगर कपा-यात तो एकटाच स्वःतशी हितगूज केल्यासारखा कोसळत असतो. झाडांची पानं न पानं चिंब होऊन ठिबकत राहतात. एका लयीत. कुठे साचलेया डबक्यात एक ताल. कुठे चिखलात त्याचं थिजणं. छोटी झुडूपं, नाजूक वेल, फुलांच्या पाकळ्या, वठलेली झाडं, आटलेली पात्र सारी सारी तृप्त समाधान पांघरून त्याचं संन्यस्त कोसळणं पाहत राहतात. किती युगं? हा सोहळा चालला आहे. त्या दूर निसर्गात जिथे कुठलं कौलारू घर नाही, ना पत्र्यांची छप्परं असतील त्याचं ताड तिरकिट ऐकू यायला. अशा जागी सबंध निसर्ग एक सुंदर लय साधून एक अविरत गीत गाण्यात मग्न होऊन गेला आहे असा भास होतो. 
             तुम्ही लाख प्रयत्न केला तरी हा सोहळा तुमच्या कॅमेरात येणार नाही. तुम्हाला निसर्ग होऊन पाऊस प्यावा लागेल. अशा जागा हेरून नुसतं जाऊन बसावं. मनावरची सगळी धूळ लख्ख धुवून घ्यावी. सुखाकरता नसती वणवण. धावून धावून दमलेली गात्र, निसर्गाच्या ह्या लयीत बुडवून टाकावीत. कोलाहलापासून दूर, चार क्षण पावसाचा नुसता आवाज ऐकण्याकरता जाऊन बसावं . निसर्ग लयलूट करतो, प्रेमाची, सुखाची पण इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सला बांधलेले आपण, जगणे नावाच्या भरधाव घोड्यावर स्वार आपण, आपल्याला कुठे क्षणाची उसंत. आपण आपल्या आत बंद होऊन गेलोय. आपली काळजी, चिंता आपली, आपली दु:खं, ताण आपले, आपण आखलेले आपले टार्गेट्स असे अनेक दरवाजे गच्च लावून घेऊन आपण आपल्यातच बंद झालोय. कुठलीच खिडकी निसर्गात उघडत नाही. गार वारा, कोवळं ऊन, भुरभूर पाऊस काही म्हणजे काहीच आत येत नाही.
            निसर्ग हाका मारतो. माणसं हाका मारतात. आपल्यापर्यंत ती हाक न पोहचू देण्याइतके आपण कुठे मग्न झालो. कधी मग्न झालो. जरासे थांबण्याने कुठली स्पर्धा आपल्याला हरवेल. निसर्गात उत्कटपणे रमून, भावनांना जरासा वाव देऊन आपण जगण्याच्या अजूनच जवळ जात असू तर? तर ते एकदा करून पहायला हवं.  
            कधीतरी आपणच मनावर घ्यावं, ज्या ज्या बंधनांनी बांधले गेलोय ते जरासे दूर सारावेत. लांब क्षितीजाकडे नजर टाकावी. उंच आभाळात पाहून दीर्घ श्वास घ्यावा. एखाद्याकडे पाहून मोकळंसं हसावं. एक एक दरवाजा आपोआप किलकिला होईल.... मग आपणच आपल्या बाहेर पडावं. जगतो आहोत, जिवंत असल्याचा अनुभव घ्यावा. फार काही नको... शांतचित्ताने दूर कुठे जाऊन पाऊस ऐकत रहावा. पावसाला पाऊस होऊन भेटावं. मला सांगा मेडिटेशन किंवा डिटॉक्स यापेक्षा काय वेगळं असणार आहे?
-बागेश्री

Thursday, 12 July 2018

जबाबदारी

तिरसट माणसांची एक जम्मत असते. ते आपल्या स्वभावामुळे सगळ्यांना स्वतःपासून तोडत जातात. शेवटी आपापसात म्हणतात "मी म्हटलं नव्हतं? सगळे स्वार्थी असतात. कुणी कुणाचं नसतं. बघ गेले ना सगळे सोडून?" 
             पण सविस्तर विचार केला तर आपल्या सगळ्यांच्या आत, कुठलातरी असा (अव)गुणधर्म असतोच की त्यामुळे माणसं बरेचदा आपल्याला दुरावतात. आपण मात्र आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यापेक्षा, दुरावलेल्यांवरच बोट ठेवून मोकळे होतो. कारण ते करणं सोपं आणि सोयीचं असतं. मुळात मनुष्य हा आळशी प्राणी असल्याने, स्वतःचे परिक्षण करण्यापेक्षा इतरांना लेबल्स लावून टाकणे त्याला जास्त सोपे जाते. शिवाय आपण किती चांगले, आपल्याला भेटणारेच कसे वाईट, ही सोयीची भावना अजून घट्ट करता येते. 
          आत्मपरीक्षण सरसकट सगळे का करत नाहीत? तर असले परिक्षण म्हणजे स्वतःचे वाभाडे काढणे किंवा स्वत:ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे. हा (गैर)समज. या पिंज-यात आपणच आपल्याला उभं करायचं, स्वतःला गिल्टी अथवा फॉल्टी करार द्यायचा. कुणी सांगितले हे उद्योग? स्वतःला हे असं कमी लेखून घेण्यापेक्षा "मी आहे तसाच/ तशीच आहे" अशी मोघम समजूत काढणे जास्त सोपे नाही का. त्यानुसार "मागच्या पानावरून पुढे" असे आपले जगणे आपण अव्याहत सुरू ठेवतो.
              पहायला गेलं तर आत्मपरिक्षणाकरता भांडवल लागतं काय. जरासं धाडस अन् परखड नजर.  स्वतःच्या वागण्यातील चूक बरोबरची शहनिशा करणारी नजर. अन् त्या अनुषंगाने स्वतःत आवश्यक बदल घडवत जाण्याचं धाडस. आणि हीच तर परिपक्व होत जाण्याची सुंदर प्रोसेस! नाहीतरी शरीर व वयाची वाढ निसर्ग क्षणभरही न थांबता करतोच आहे.                   
            जगताना ज्यांना आपण दैवत मानतो त्यांच्याकडे पाहण्याची परखड नजर कुठल्यातरी क्षणी आपल्याला मिळते. आणि आपले "दैवतही चुकू शकते " हा साक्षात्कार होतो. हीच ती आवश्यक असणारी परखड नजर. तिचा झोत जरासा आत, आपल्या दिशेने वळवला की त्या उजेडात सहज घडतं ते, आत्मपरिक्षण. परंतु साधनेशिवाय सहजता येत नाही. 
                  
विवेकानंद म्हणाले होते, "कुणाला काहीही वाटले तरी आपण आपल्या जाणिवांच्या वाटेवर अथक चालत रहावे" हे सांगताना, जाणिवा प्रगल्भ करून घेण्याची जबाबदारी त्यांनी हळूच बिटवीन दि लाईन्स मध्ये पेरून टाकली. ही प्रगल्भता मिळवण्याचे उपयुक्त टूल आत्मपरीक्षण असू शकते.
       खरं सांगायचं तर जोवर "आपण जन्म घेऊन इथे का आलोय" ह्या प्रश्नाचा भोवरा मनात गरगरत नाही तोवर परिक्षणाचं टोक काही हाताशी लागत नाही. शिवाय हे असे विचार/ परिक्षण वगैरे मुद्दाम करण्याची गरज असतेच कुठे? तुम्ही तुमच्यात असताना किंवा तुम्ही तुमच्यात नसताना किंवा असेच, निवांत अंग सैल सोडून कुठेतरी उगाच बघत बसलेले असताना "आपण इथे का आलोय" चा किडा नकळत डोक्यात वळवळू लागेल आणि स्वतःचा तळ जोखण्याची धडपड आपसूक सुरू होईल..... तेव्हाच विवेकानंदांनी सोपवलेली जबाबदारी, खऱ्या अर्थाने कळून येईल.
-बागेश्री देशमुख

Friday, 6 July 2018

स्वप्नांची कूस वळते

उरी काहूर का आहे
मन एकाकी असताना..
चंद्र आतूर का आहे
रात अस्ताला जाताना

हे रस्ते ओलेसे
हवेला नूर ही आहे
मातीला गंध ही ओला
आभाळी ढगही नसताना...

कुठला वारा सुटला हा
अन् पाचोळा झाला..?
सारे नव्हते होत्याचे
वादळी चिन्हच नसताना

वातींचे फरफरणे खोटे
सावल्या थरथर होताना
मनाने अधिरसे होणे
जीव जीवात नसताना...

कुणाचे डोळे वाटेवर
अधाशी वाट पाहताना
वाजती भास कानाशी
पावले उमटत नसताना

मी गम्य अगम्याचे
कोडे उलगडताना
स्वप्नांची कूस वळते
मज उबेत घेताना
-बागेश्री

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...