लहान असताना एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा एकमेव पर्याय "पत्रव्यवहार" होता. त्यात दर तीन वर्षांनी वडिलांची दुस-या गावी बदली त्यामुळे सोडलेल्या गावातील मैत्रीणी, जुन्या शाळेतील शिक्षकांस "गुरुपौर्णिमे" निमित्त कृतज्ञतापूर्ण पत्र आवर्जून लिहिले जायचे. आजोळी पत्र लिहिताना तर अंतर्देशीय पत्राचे शेवटचे पान आमच्यासाठी राखीव होते. मग आम्ही भावंडे एकमेकांना आमचं काय चाललंय, नवे "चाचा चौधरी, चांदोबा, किशोर" कलेक्शन केले की नाही, 'सुट्टीत भेटू' या आश्वासनापासून ते सध्या परीक्षेच्या काळाने काय दाणादाण उडवून दिली आहे याचा अहवाल देऊन पत्राचा शेवट 'नव्या' भावंडांना गोड पापा लिहून व्हायचा. उत्तरादाखल भांवडाचेही शेवटचे पान यायचे.
वय वाढलं. निरागसतेची जागा पौंगडाने घेतली. आमचे राखीव पान अधिकृतपणे आमचेच असले तरी आता मजकूर बदलला. आखूड झाला. खाडाखोडीने जागा मिळवली. काय सांगायचे ते जशाचे तसे निघून घेले की वाक्य खोडून ते जरा भारदस्त वाटावे (आपण मोठे झालोय) असा अविर्भाव आला. तिकडूनही तशीच उत्तरे आणि खोडलेले शब्द. नेमके तेच वाचण्याची नवी सवय लागली. त्यातून शब्दांतला, भावनेतला सच्चेपणा शोधण्याची धडपड पत्रवाचनाचा अविभाज्य भाग झाली. ते शब्द मनात शांत पडून असलेल्या कुतुहलाची शेपटी ओढायचे. त्यामुळे नेमकं काय सांगायचं 'टाळलंय' याची मीमांसा केल्यावाचून पत्र खाली ठेवले जायचे नाही.
आता काळ बदलला. तंत्रज्ञानाने संवाद सुकर केला. पत्र पाठवणे ते उत्तर येणे यातला महिनाभराचा काळ सेकंदांवर आला. मनातलं सांगणं, ते पोचणं व त्याला प्रत्युत्तर सगळं त्वरित. वाट पाहण्यातली हुरहूर व त्याकरता हव्या असणा-या संयमाची जागा, ब्लु टिकने घेतली. आणि मग झुकरबर्गने गंमत केली!
"डिलीट फॉर ऑल" नावाचे फीचर आणले. आता आलेला मेसेज आपण वाचेस्तो कुणी डिलीट केला रे केला, की कुतुहलाची शेपटी ओढलीच समजा! बरं, डिलीट करण्याची मुभा दिलीच आहे, तर त्याचे नोटिफीकेशन समोरच्याला कशाला? म्हणजे जसे पत्रातून खोडलेले शब्द नाहीसे करता येत नाहीत, उलट त्या आडव्या रेघेखालचे शब्द आपल्या कल्पनाशक्तीला ढुसण्या देत राहतात. अगदी तसेच "अमुक तमूक डिलीटेड धिस मेसेज" हे वाचतच नेमके काय डिलीट केले असावे या प्रश्नाचा पाय पडून जागे झालेले कुतुहल आपलीच शेपटी पकडण्यासाठी गिरक्या घेत राहते.
शिवाय मेसेज "कुणी" पाठवून डिलीट केलाय यावर अस्वस्थतेचे गुणोत्तर अवलंबून असते. व्यक्ती जेवढी महत्त्वाची तेवढे ते कुतुहल तुम्हांला फिरवते. जोवर पुढुन काय डिलीट झाले व ते का करावे लागले याचा (आपल्याला खरा वाटेल असा) खुलासा होत नाही, तोवर मनाला स्वस्थता येत नाही. पण जर, व्यक्ती तेवढी जवळची नसेल तर कुतुहल फारच इतकुसे चाळवून शेपटी जवळ खेचून पुन्हा आपले आपण स्वस्थ पडून राहते.
मुळात झुकरबर्गने संवादातील हरवलेली हुरहूर हळूच खोडलेल्या वाक्यांखाली दडवून आपल्याला परत दिलीय, हे नक्की.
-बागेश्री
0 Comments