स्वैर त्याची ही कहाणी

रंग खेळायला तुला

कान्हा लाख मारे हाक

लाल लाजेने आरक्त

राधे आधी मुख झाक..

जरी सखा तो लाडका

पण नाठाळ गं भारी,

सांभाळून वाट चाल

आहे लबाड रंगारी..


स्वैर रूप तो धारिता

राधा तूही रंगशील,

रंग त्याचा तुझा एक

कशी विलग होशील?

बरसेल आसुसून

तुज करील बेधुंद,

परि सावर स्वतःला

नको होऊस बेबंद..


क्षणी भान तू हरता

त्याचे आयते फावेल,

चिंब तुजला करून

मनाजोगते साधेल...

वारा मदतीस त्याच्या,

तुझा पदर ढाळाया..

धाव- धावशील कोठे?

चराचरी त्याची माया


वेड तुझे त्याला आहे,

जशी त्याची तू दिवाणी

परि जप तू स्वतःला,

लाज राखूनिया मनी...

आज इथे उद्या नाही,

स्वैर त्याची ही कहाणी

मग झुरशील पुन्हा

गात विरहाची गाणी...!!

-बागेश्री 


Post a Comment

0 Comments