साल १९९८. इयत्ता १० वी. सायन्स ट्युशन. बोर्डाची प्रिलिम्स सुरु असण्याचे दिवस. प्रत्येक क्षण महत्त्वाचा. बाईंची एक खास पद्धत शिकवण्याची. एका धड्याचे दोन भाग करायचे. तसेच ट्युशनच्या मुलांचेही दोन गट करायचे. अर्धा धडा एका गटाला. अर्धा दुस-याला वाटून द्यायचा. दुसरे दिवशी एका गटाने दुस-या गटाला त्याला दिलेल्या भागावर रॅपिड फायर प्रश्न विचारायचे. प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला ५ गुण. आणि चुकले की ५ वजा. शिवाय विजेत्यांना बाईकडून प्रत्येकी एक एक्लेअर्स! यात व्हायचं हे की दोन्ही गटांचा नकळत संपूर्ण धडा अभ्यासला जायचा. आपल्याला पलिकडच्या भागावर प्रश्न विचारायचे आहेत म्हणून. व आपल्या भागावर प्रश्न विचारले जातील म्हणून. धड्याची ओळ न ओळ नजरेखालून जायची आणि जिंकण्याची ईर्ष्या प्रचंड अलर्ट ठेवायची. असाच रॅपिड फायर रंगला होता. आमचे प्रश्न विचारून झालेले. त्यांचा १६५ चा स्कोअर मोडायचा होता. आम्ही अजुनतरी एकही उत्तर चुकलो नव्हतो. प्रत्येक प्रश्न उत्तराच्या बॅटवर बरोब्बर घेऊन बॉंंड्रीपार करत होतो. एवढ्यात बाईंचा लँडलाईन फोन वाजला. बाईंनी खूण केली. खेळ थांबला. मॅच फॉर्ममधे असताना पावसामुळे बंद करावी लागते तसे हिरमुसलो. टेम्पो जातो हो! फोनवर पलिकडून "आमच्या पिंकूशी बोलता येईल का?" बाई रिसिव्हरवर हात धरून, "पिंकू कोणाय? तिच्या घरून फोन" आईशपथ. मी ओशाळून फोन घेतला. जमेल तितकी हळू बोलत होते तरी आनंद लपला नसावा. फोन ठेवल्यावर. "बाई मी घरी जाऊ प्लीज? माझे मामा आणि भावंड आलीयेत. ती लगेच पुढे जाणारेत. मग वर्षभर भेट नाही होत."
हे काय म्हणजे? वय काय. बोर्ड तोंडावर. अभ्यासाचे दिवस भरात. इकडे आपली टीम जिंकतेय. आणि माझा ओढा घराकडे? बाई हो (च) म्हणतील ही आशा. तिसरा अंपायर निर्णय देत नाही तोवर होणारी कालवाकालव माझ्या चेह-यावर. बाई म्हटल्या "अगं, जा की!" ... मला आठवतं त्यांचा "की" शब्दाचा ध्वनी हवेत विरायच्या आत, दप्तर भरून मी सायकल स्टँडवरून काढली सुद्धा. आणि सुसाट घराकडे सायकल हाणत निघाले.
घरी मामा- मामी भेटले. अ पा र लाड करून घेतले. भावंडं भेटली. गप्पा टप्पा टाळ्या झाल्या. एकमेकांना खिजवून झाले. त्यांनी आवर्जून आणलेल्या गावच्या मेव्यावर ताव मारून झाला! मी धावत आलेल्याचं कौतुकही करून घेतलं. तासभर कसा सर्र्कन गेला. तेवढ्या तासभराच्या आपुलकी, प्रेम जिव्हाळ्याकरता वाटलेली ओढ मला आजही विसरता येत नाही.
आज सारेच किती बदलले आहे. अघोरी स्पर्धेचे युग आहे. आम्ही मामा- मामी झालो. आमची भाचरं इतकी अभ्यासात फोकस्ड आहेत. सांगता सोय नाही. विचार येतो. आज मी सहज म्हणून त्यांच्याघरी गेले आणि भाच्याला फोन करून "येतोस काय रे, मी आलेय" म्हणू शकेन का. आलाच विचार आणि केला फोन, तर तो भर ट्युशनमध्ये फोन उचलेल का. उचललाच फोन तर धावत येईल का? प्रेम माया आहेच की आपलीही तेवढीच. आपण जीव लावतो तसा त्यांनाही पुरेपूर लळा आहे आपला. आपल्याला पाहून डोळे चमकतातच त्यांचे. हक्काने लाड करवून घेण्याचा स्वभावही आहे. मात्र जाणवतं इतकंच की या स्पर्धेने नात्यातल्या ओढीलाही विळखा घातलाय........
पण त्यादिवशी सायकलवर सुसाट घरी येताना मला वाटलेली अनिवार ओढ, त्यातली असोशी आजही हवीहवीशी वाटते!! काही आठवणीत त्या त्या काळच्या जिवंतपणाच्या खुणा असतात. त्याच आपल्या असतात.
-बागेश्री
2 Comments
खूपच गोड..
ReplyDeleteकित्ती गोड!! 👏💕
ReplyDelete