जुबीली Jubilee on Amazon Prime

प्राईम व्हीडिओवर "जुबीली" नावाची वेब सिरीज आहे. तिचा पहिला एपिसोड पाहिला आणि तिने खिळवून टाकले. फिल्म इंडस्ट्रीत घडून गेलेले व विसर पडलेले एक काळे सत्य या कथेचा मूळ आत्मा आहे.


श्रीकांत रॉयचे "रॉय टॉकीज" म्हणजे १९४७ काळात मुंबईतील एक नामांकित प्रोडक्शन हाऊस. त्यांची पत्नी सुमित्रा कुमारी त्या काळातली भारतातली टॉपची नटी. रॉय टॉकीज हिरोच्या रुपात कायम नवा चेहरा इंडस्ट्रीला देऊन, प्रस्थापितांना चकित करण्यात मातब्बर. अशाच त्यांच्या आगामी सिनेमासाठी नवा चेहरा शोधण्यापासून "जुबली" सुरू होते. आणि ऑडिशन्समधून 'जमशेद खान' म्हणजेच सिनेमातील नाव 'मदन कुमार' निवडला जातो. जमशेद थिएटर करणारा अफलातून नट. हिरोईन अर्थातच सुमित्रा कुमारी. सारं ठीक पण नेमकी सुमित्राच जमशेदच्या प्रेमात पडते आणि दोघे लखनऊहून कराचीला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खबर लागते. श्रीकांत रॉयच्या तोंडचं पाणी पळतं. "आम्हाला आमचा मदन कुमार सापडला आहे" अशी वर्तमानपत्रातून जाहिरात झाल्यामुळे श्रीकांत जमशेदलाही सोडू शकत नाही. दोघे पळून गेल्यास प्रसंग अगदीच लाज आणणारा ठरेल याची  त्यांना खात्री आहे. घरातला हा पेचप्रसंग सोडवण्याकरता श्रीकांत रॉय आपल्या असिस्टंट बिनोदला लखनऊला रवाना करतो.  श्रीकांतचा बिनोदवर अतोनात विश्वास. त्यांची सगळी काळी रहस्य बिनोदला ठाऊक. हाच बिनोद उरीपोटी नट होण्याचं स्वप्न घेऊन रॉय टॉकीजमधे गेली अनेक वर्षे कामाला. बिनोद सुमित्राला समजावून माघारी आणतो, जमशेद परतत नाही. श्रीकांत बिनोदला कामगिरी व्यवस्थित पार पाडली नाहीस असा बोल लावतो कारण बायको हवीच पण आगामी मदन कुमार, त्याचे काय. पुढील सिनेमाचे काय? श्रीकांत अस्वस्थ. ती वेळ साधत बिनोद आपल्या अदाकारीची एक अशी अप्रतिम झलक दाखवतो की  त्याच क्षणी श्रीकांतला नवा मदन कुमार सापडतो. परंतु जमशेदचे काय झाले?

याचे उत्तर सिनेमा इतिहासातील एका पानात फार पुर्वीच दडले आहे. काळाच्या पोटात अनेक रहस्य गडप होतात. अशाच एका रहस्यावर ही वेबसिरीज बेतली आहे. बेतलीय म्हणायचं कारण जाणून घेण्यासाठी १९३८ मध्ये, बॉम्बे टॉकीजचे सर्वेसर्वा हिमांशू रॉय व देविका राणी यांच्या आयुष्याकडे वळू. "जीवन नैया" सिनेमाकरता हिमांशू रॉय यांनी देविका राणी व नजाम- अल- हसन यांना कास्ट केले. चित्रीकरणाच्या काळात ते दोघे खरोखर प्रेमात पडले व चित्रीकरण रखडून परागंदा झाले. संतप्त हिमांशूंनी साऊंड इंजिनीअर 'सशाधर मुखर्जी' यांना त्या दोघांच्या पाठी पाठवले व मुखर्जी देविका राणीला समजावून परत घेऊन आले. हिमांशूंनी नजाम- अल- हसन यांना सिनेमातून तडीपार केले व बॉम्बे टॉकीजमधून घालवले. त्या जागी त्यांचे लॅब असिस्टंट (सशाधरांचा मेव्हणा) 'कुमुदलाल गांगुली' उर्फ 'अशोककुमार' हिरो म्हणून लाँच झाले. पुढे त्यांनी मोठा काळ गाजवला.



पुन्हा जुबलीकडे येऊ. तर जमशेदचा विरह सुमित्राकुमारीने इतका जिव्हारी लावून घेतला की "रॉय टॉकीज" व खुद्द आपल्या नव-याचे भले बुरे सोडून जमशेदचे नेमके काय झाले, या ध्यासाने पछाडल्या. लखनऊमधे जमशेदचे जे काही घडले त्याला साक्ष दोनच लोक. एक बिनोद दुसरा जय खन्ना.
पुढे बिनोद 'मदन कुमार' म्हणून नावारूपाला येत असताना जय खन्नाही दिग्दर्शक व कलाकार म्हणून पुढे येतो. सोबतीला 'निलोफर' नावाची नटीही इंडस्ट्रीत उभी राहते. या सगळ्यांचा, कुणीही नसल्यापासून ते सिलीब्रीटी होण्याचा प्रवास जुबली आपल्यासमोर उलगडते.
     वेबसिरीजची निर्मितीमूल्यं उत्कृष्ट आहेत. दिग्दर्शक मोटवानींनी फाळणीची पार्श्वभूमी वापरली आहे. फाळणी, लोकांची वाताहत, कॅम्प, जगण्याची धडपड, कलावंत म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, तेव्हाची फिल्म इंडस्ट्री, प्रोड्युसर, त्यावेळी रुसी आणि अमेरेकी लोकांचा भारतीय चित्रपसृष्टीवर असलेला पगडा सारे कंगोरे येतात. आणि कुठेही १९४० ते ५० चा काळ सुटत नाही, फिल्मसेट्स व वेशभुषा प्रभावी झालीय. प्रत्येकाने आपली भुमिका काम इतकी चोख निभावलीय की कुणीच उपरं वाटत नाही. हरएक व्यक्तिरेखा कथेचा भाग होऊन गेली आहे. 'राम कपूर' यांनी 'वालिया' नावाचे कॅरेक्टर केलेय. त्या काळचा प्रोड्यूसर त्यांनी फारच ताकदीने उभा केलाय. आणि विशेष उल्लेख करेन, गाणी व संगीत! अमित त्रिवेदीने काळ उभा केलाय. कौसर मुनीरने लिहिलेली गाणी त्या काळाशी एवढी सुसंगत की तुम्ही ते सगळं पाहतांना, २०२३ मधून १९४७ मधे जाताच जाता. फार काळानंतर एखादी अशी सघन कलाकृती पाहिली आहे की तुम्हांपैकी ज्यांच्याकडे प्राईम व्हिडिओ आहे, त्या प्रत्येकाने ही आवर्जून पहावी, असंच म्हणेन.
-बागेश्री

Post a Comment

0 Comments