वचन

'राधे, तू सर्वस्व आहेस'
या तीन शब्दावर
जन्म पणाला लागले कान्हा!
माझा माझ्यावर
अधिकार राहिला नाही
माझे म्हणून माझ्यात काहीच उरले नाही
तुझी, तुझी होऊन गेले..

तू व्यस्त राहिलास
जनपदाच्या प्रवासात..
धर्म कर्तव्यात,
कर्म प्रवाहात,
मी जगत राहिले
माझं जगणं...
तुझ्याशिवाय,
माझ्यावाचून!

कधीतरी
कुठेतरी
गाठ मला
आणि
या पोकळ वेणूत
सर्वस्वाची फुंकर घाल कान्हा..
कर मुक्त
कोंदलेले सूर,
घेऊ दे त्यांना
मोकळा श्वास!
फक्त यावेळी मात्र
सांगू नकोस त्यांच्यावर
कुठलाही हक्क ...!

तुझ्या वचनात
पुन्हा एकदा
अनंत काळासाठी अडकलेलं
आता सोसता यायचं नाही, कृष्णा...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments