अंगार

तुम्ही कुणीच नसता तेव्हा
खूप असतात,
तुमच्यावर तोंडसुख घेणारे
तुमच्या कुवतीवर शंका घेणारे
तुमच्या प्रत्येक कृतीला तुच्छ लेखणारे
तुमच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह ठोकणारे!

ते सोडत नाहीत,
तुमचं शील
तुमचं नशीब
तुमचं दैव
तुमची लायकी
तुमची वृत्ती अथवा
जगासमोर असलेली
तुमची आजची आवृत्ती!

त्या प्रत्येकासाठी
आपण तेच होऊन दाखवावं
जे होण्याकरता आपण निवडला होता
आपला वेगळा रस्ता,
त्यांचा धोपट मार्ग सोडून...
आणि मानावेत त्यांचेच आभार
आपल्या आतला अंगार सतत
तेवता ठेवला म्हणून...!
-बागेश्री


Post a Comment

0 Comments