Mrs Chatterjee Vs Norway #Netflix

काही सिनेमे सुन्न करतात, काही विचार करायला भाग पडतात तर काही 'सत्यकथा' आपल्यापर्यंत संवेदनशीलरित्या पोचवतात.  'सागरिका चक्रवर्ती' च्या आयुष्यावर बेतलेली ही सुस्पष्टपणे एका आईची कथा आहे. तिच्या मुलांप्रती असलेल्या तिच्या वेड्या मायेची आहे. तिच्यावर अवलंबून असलेल्या तिच्या लेकरांची आहे.
      लग्न करून नॉर्वेला सेटल होण्याच्या उद्देशाने आलेले चॅटर्जी दाम्पत्य. मिस्टर चॅटर्जी नॉर्वेची सिटीझनशीप घेण्यासाठी झपाटलेले. मिसेस चॅटर्जी हाऊसवाईफ. दोघांत घडलेला एक घरगुती हिंसेचा प्रसंग मिस्टर चॅटर्जीचा मित्र, नॉर्वे पोलिसात नोंदवतो. आणि 'चिल्ड्रन वेल्फेअर ऑफ नॉर्वे'चे या दाम्पत्याकडे लक्ष जाते. त्यांची मुलं पालकांबरोबर सुरक्षित आहेत की नाही, याचे परीक्षण सुरू होते. परिक्षणाचा कालावधी ६ महिने! रोज वेल्फअर कमिटीचे २ प्रतिनिधी घरात येणार, मुलांचे संगोपन कसे चालते ते बघणार. टिपणं काढणार. त्यात आढळते, की ही भारतीय आई मुलांना काटा चमच्याने भरवत नाही, चक्क हाताने खाऊ घालते म्हणजे हा तर बळजबरीचा घास! मुलांना काजळाचे तीट लावते, किती अघोरी प्रथा. मुलांवर अतिजास्त प्रेम करतात, मुले आई बाबांसोबत एकच पलंगावर झोपतात (शुभ २ वर्षांचा, सूची ५ महिने). एकदंर भारतीय संगोपनाची पद्धत नॉर्वे बाद ठरवते व चॅटर्जींची मुलं वेल्फेअरच्या कस्टडीत घेतली जातात. ती ही कशी? पालकांना रीतसर सांगून? नव्हे. पळवून, हिसकावून.
             इथून सुरू होतो मिसेस चॅटर्जीचा मुलांचा ताबा पुन्हा मिळवण्याचा प्रवास. वरील टिपणांच्या आधारे मिसेस चटर्जींचे मानसिक स्वास्थ्य हललेले आहे असे ठरवत केस सुरु होते व आई संगोपनासाठी सक्षम नाही, हे सिद्ध केले जाते. मुलांचा ताबा नॉर्वे स्वतःकडे घेतो. मुलं अ‍ॅडोप्शनसाठी पाठवली जातात. मिस्टर चॅटर्जींना आपल्या सिटीझनशीपची काळजी असल्याने ते जेवढे जमेल तेवढेच या लढ्यात सहभागी होतात. मिसेस चॅटर्जी म्हणजे ख-या आयुष्यातील सागरिका नव-याच्या सहकार्याशिवाय एकटी व असाहाय झाल्यानंतर तिने दिलेला अखंड लढा अभूतपूर्व आहे. ख-या आयुष्यात तिने सुषमा स्वराज यांची मदत मिळवली, ती कशी. तिने काय काय केले. नॉर्वेतली केस भारतात कशी ओपन झाली. असे अनेक कंगोरे या कथेला आहेत. पण आईची धडपड आपलं हृदय नक्की पिळवटून टाकते. आणि सगळ्यांत महत्त्वाचे, भारतीय पालकांना वाईट ठरवत नॉर्वे का त्यांची मुले आपल्या ताब्यात घेतात, यामागचे काळे सत्य उलगडले आहे.
     राणी मिसेस चॅटर्जीच्या भूमिकेत अनेक ठिकाणी लाऊड झालीय, परंतु जेव्हा कुठेच आशेचा किरण दिसत नसेल आणि हक्काची मुलं, ज्यात तिचं एक लेकरू अजून तिच्या अंगावर पितंय, अशा बाळाचा विरह एखाद्या आईला विकल करणार नाही का? हा विचार डोकावतो. काही ठिकाणी फिल्मी लिबर्टी घेतलीय, ती खटकते.
         मुलांचा ताबा आणि स्वतःचा हक्क परत मिळवण्यासाठी एका आईने, अख्ख्या नॉर्वे सरकाराविरुद्ध केलेली ही लढाई ख-या प्रेमाच्या ताकदीचे दर्शन घडवणारी आहे.
-बागेश्री


Post a Comment

0 Comments