Film review : चंदीगढ करें आशिकी

 

अभिषेक कपूर दिग्दर्शित "चंदीगढ करें आशिकी" पाहिला. नाव वाचल्यावर क्षणभर बघावा की नाही, असे वाटले तरी आयुषमान खुराणा कायमच वेगळ्या धाटणीच्या स्क्रीप्ट्स निवडतो म्हणून पहायला घेतला आणि अजिबातच निराशा झाली नाही.


कधा चंदीगढमधे घडते. नायक मन्नू ( आयुषमान) ची जिम आहे. ज्याला एकही मेंबर नाही. हा एकटाच तिथे कायम वर्कआऊट करतो. वेट्स उचलतो. त्याने उत्तम शरीर कमावलेय कारण त्याला चंदीगढमधे पहेलवानांकरता होणारी G.O.A.T स्पर्धा जिंकून आपण सर्वोच्च ताकदवान आहोत हे सिद्ध करायचंय. गेली दोन वर्षे तो दुस-या क्रमांकाचा विजेता आहे. पहिला नंबर दरवेळी सँडी पटकावतो. परिणामतः सँडीचे फिटनेस फॉलोवर खूप आहेत आपसूक त्याची जिम जोरात सुरु आहे. रग्गड मेम्बर्स आहेत. थोडक्यात मन्नू सँडी कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. खेळात व्यक्तिगत आयुष्यातही. मन्नू ३२ चा झालाय पण या  G.O.A.T पायी अविवाहित आहे. मन्नूवर विश्वास ठेवणारे फक्त त्यचे दोन जुळे मित्र आहेत. तेच कुठूनसे मानवीला (वाणी कपूर)   ला आणतात. जी झुम्बा ट्रेनर आहे. मन्नूच्या जिममधे मानवी तीन महिन्याच्या कॉंट्रॅक्टवर आपले झुम्बा क्लासेस सुरू करते आणि बघता बघता जिमची भरभराट व्हायला लागते. मानवी दिसायला सुंदर, झुम्बाला शोभेल अशी सडसडीत स्वभावाने शांत. परिणामी ती मन्नू प्रेमात पडतात. इकडे मधेमधे आपल्याला मानवी कसल्यातरी गोळ्या सतत घेत असल्याचे दाखवलेय. त्याबद्दल मन्नूला ती सांगण्याचा प्रयत्नही करते, परंतु त्याक्षणी मन्नू ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. त्यांचं नातं फुलत जातं. ज्या क्षणी मन्नूला जाणीव होते आता मानवीशिवाय जगता येणार नाही तो तिला प्रपोज करतो! आणि..... मानवी आपला गुढ भूतकाळ त्याच्यासमोर उकलते. सिनेमा इथे पोहोचेस्तो तिच्या आयुष्याचे गूढ काय असेल याचा प्रेक्षक म्हणून, आपण सर्वप्रकारे विचार करून पाहतो. पण ती जे सांगते त्याने नायकाइतके आपणही तीन ताड उडतो. हा सिनेमाचा उच्चबिंदू आहे!!  

मन्नूला मानवीचे सत्य अजिबातच पेलता येत नाही. तो अंतर्बाह्य हादरतो. अद्वातद्वा बोलतो आणि तिथून तडक निघून जातो.


            पुढचा प्रवास मन्नूचा मानवीचे सत्य पचवण्याचा आहे. ती एक प्रोसेस आहे. ज्या प्रोसेसमधे आपणही मानवीला समजून घ्यायला लागतो.  मानवी एक उदाहरण धरले तर मन्नू समाजाचे प्रतिनिधीत्व करणारा चेहरा आहे. जो आपणा सर्वांशी मिळताजुळता आहे. त्यामुळे त्याचे मतपरिवर्तन हे आज समाजाकडून अपेक्षित असलेले मतपरिवर्तन आहे. ते दिग्दर्शकाने आपल्यापर्यंत चपखल पोहोचवलेय. विषय आजचा आहे आणि तो हळूवार हाताळलाय.

              क्लायमॅक्सकडे सिनेमा ड्रामाटिक होतो तरिही कुठेही अतिगंभीर होत नाही. हलकी खुसखूस कायम राखली आहे. ही सिनेमाची जमेची बाजू. आयुषमान वाणीचा सहज अभिनय. सिनेमात दिसणारे चंदीगढ तिथली माणसं गाणी उत्तम जमून आलेल्या गोष्टी आहेत.

I recommend  this movie. It's available on Netflix.

-बागेश्री

Post a Comment

0 Comments