अविनाशी नीळकंठ




जगता जगता जगणंच
घुसळवू लागतं आपल्याला
आणि त्यातून
शहाणपण, दया, संवेदना अशी 
माणिके लागतात हाताला..
इतकंच नव्हे तर 
एक अत्यंत व्यवहारी 
आणि हिशेबी
'प्रतिमन'ही येतं जन्माला ..

ते ठेवू लागतं तपशील
प्रत्येक बारिक गोष्टीचा
शिवाय त्याची आकडेमोड पक्की,
बेरजा गुणाकार नसेल पण
वजाबाकी भागाकार 
जमतो नक्की...
त्याच्या नोंदवहीत
प्रत्येकाचे हिशेब,
काळ-वेळेसह छापलेले...
प्रसंगी कठोर होण्याची बुद्धी, त्याचीच!
व्यवहार चुकता झालाच पाहिजे
बाकी शून्य आलीच पाहिजे...!
प्रतिमनाची चौकट अशी भक्कम
की  त्याचे सगळे कोन मोजून ९० अंशाचे
तिथे अघळपघळ काही नाही
नाती नाही- गोती नाहीत
आयुष्याच्या घुसळणीपूर्वी
अस्तित्वात असलेलं
साधं- सुधं मन तर
खिजगिणतही नाही..
आपण उगाच का म्हणतो
अमका तमका पुर्वी असा नव्हता
"आता फारच बदलला...!!"

समुद्रमंथनातून केवळ
हिरेच नव्हते ना आले?
हलाहलही मिळाले!
तिथे मात्र साक्षात महादेव
होते प्रकटले
जगाला वाचवायला......
इथे मात्र
आपणच घेऊन पुढाकार
व्हायचे आपले तारणहार,
घ्यायची आपल्या संयमाची गंगा नि
हास्याची कोर
आपल्याच डोईवर.. आणि
रिचवायचे वेळीच   
प्रतिमनाचे हलाहल,
प्राशून आकंठ 
होऊन आपणच आपल्यापुरते
अविनाशी नीळकंठ !!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments