भारतीय स्वातंत्र्यदिन

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली, आजच्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणा-या त्या प्रत्येक स्वातंत्र्यवीराचे स्मरण होते आहे ज्यांनी "स्वतंत्र भारताचे" स्वप्न उरीपोटी बाळगले, डोळ्यांत जागवले. हे करत असताना आपल्याला तो भारत पहायलाही मिळणार नाही याची त्यांच्या मनाला संपूर्ण जाणीव असूनसुद्धा ब्रिटीशांची सत्ता घालवून द्यायला प्राण तळहातावर घेत त्यांनी आंदोलनं केली. चळवळी उभ्या केल्या. आजच्यासारखी संवादाची माध्यमं तेव्हा नव्हती. तरीही समन्वयित हल्ले चढवले. मोजकी हत्यारे, हाताशी असलेली तुटपुंजी माहिती, मरणाची शंभर टक्के खात्री असून पुढाकार घेत राहिले. अडचणी लाखो होत्या पण ध्यास अमर होता. आपण मूळ भारतीय आहोत मग एखादा परकीय आपल्यावर सत्ता करूच कशी शकतो. आपल्याच लोकांना गुलाम करून आपल्या मायभूमीला तुडवत आनंदी रहायचा अधिकार त्याला कुणी दिला. तोवर भारताला गुलामगिरीचा आलेला हा पहिला अनुभव नव्हता. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याला देशोधडीला लावून स्वराज्य प्रस्थापित करण्याची किमया शिवरायांनी करून दाखवली होती. पण प्रजा गुलामगिरीला जेव्हा- जेव्हा बळावेल तेव्हा- तेव्हा परकीय घुसघोरी करतीलच. तुमच्याच हातून तुमची मायभूमी सहज काढून घेऊन तुमच्यावर राज्य करतील हे ब्रिटीशांनी पटवले होते आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्याची आस घेऊन देश पेटून उठला होता. जहालमतवादी असो वा मवाळ विचारसरणीचे, ध्येय एकच होते. स्वतंत्र भारत! आणि ते प्राप्त करण्यासाठी प्राणांचे बलिदान. आज त्यांच्या स्वप्नांतला भारत आपली पंच्याहत्तरी पूर्ण करतोय. स्वतंत्र भारतात जन्माला येण्याचं, आपल्या स्वप्नांना आकार देण्याचं काम निडरपणे करण्याचं भाग्य आम्हांला लाभलं ते स्वातंत्र्यवीरांच्या त्या ध्यासामुळे, त्यांच्या बलिदानामुळे. त्यांना शत शत प्रणाम.
              त्या स्वातंत्र्याची रक्षा आज सीमेवर अहोरात्र करणा-या, ज्यांच्या जीवावर आम्ही निर्धास्त झोपतो, करीअर करतो, सुखी कौटुंबिक आयुष्य घालवतो त्या सर्व जवानांपुढे हे शीर नतमस्तक आहे.
                इतिहासाला साक्ष ठेवून, गुलामगिरीची बीजं पुन्हा देशात रूजू न देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सीमेवरच्या रक्षणाइतकेच आतही सजग नागरिक असल्याचं भान जागरूक राहणं गरजेचं आहे. जिथे गोष्टी चुकीच्या वाटतात त्याबद्दल बोलले पाहिजे. लोकशाही ती मुभा आपल्याला देते. याचवेळी जेव्हा काही योग्य घडते तेव्हा त्याचा गौरवही करण्याचा महान गुणही इतिहासाकडून आत्मसात केला पाहिजे.
                  भारताच्या गौरवशाली इतिहासाला विनम्र नमन. भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो..... 🙏🇮🇳
-बागेश्री

Post a Comment

0 Comments