गोष्ट छोटीच आहे




इंजिनीअरींग करायला घराबाहेर पडले. कुठे? उदगीर! मुलीने घराबाहेर रहायचं तर पहिला सुरक्षित पर्याय काय? गर्ल्स हॉस्टेल! उदगीर पिंजून काढलं. बॉईज होस्टेल ढीगाने. मुलींकरता मात्र सोयच नाही.  असे का? तिथे मुली फारश्या येतच नाहीत शिकायला. मग आता काय? कॉलेज तर मिळालं, अ‍ॅडमिशनही झालं, रहायचा प्रश्न. मग तोडगा निघाला, माझ्यासोबत माझी आजी रहाणार, रूमच करायची. शोध सुरू. मुक्कावारांचा बंगला. वर दोन खोल्यांचं घर होतं, रिकामं. घरात हवा म्हणाल तर इतकी खेळती की पडदे जागी रहायचं काम नाही. शुभ्र सपाट भिंती. त्यावरून परावर्तित होणारा उजेड एवढा की ट्यूबलाईट लावायचं काम नाही. बस्तान बसलं. रूटीन सुरु झालं. माझं कॉलेज, आजीचा देवधर्म, स्वयंपाकपाणी. सगळं सुरळीत. एकही कप्पा नसलेल्या शुभ्र सपाट भिंतींवर काहीतरी पोस्टर तरी लावूया, असं आजीचं मत पडलं. मी १८ ची, तिची साठी उलटलेली. तरी म्हटलं  "बरं......"

लहान असताना कुलदैवतेबद्दल माहिती देताना बाबा, सांगतात "पण शेवटी आपला देव आपणच निवडायचा. श्रद्धा महत्त्वाची. श्रद्धेमुळे माणसाचे पाय जमिनीपासून सूटत नाहीत. संकट आलं तरी श्रद्धेच्या जोरावर मात करता येते..  ज्या देवापुढे हात जोडल्यावर तू सगळं खरं सांगतेस, मनातलं काहीही ज्याच्याशी बोलावं वाटतं, बोलल्यावर तुला धीर येतो, तो तुझा देव" तोवर घरात प्रत्येक कार्य आरंभ श्री गणेशाच्या पूजेने होताना,  ||श्री|| लिहिल्यावाचून किराणामालाची यादीही लिहिली जात नाही याची मनाने नकळत नोंद घेतली होती. गणपतीपुढे वाकून काय मागायचं "मला सुबुद्धी दे" त्या वयापासून त्याच्याशी गट्टी जमण्याचं दुसरं कारण म्हणजे, बालगणेशापासून ते पोलिस डॉक्टरच्या वेषातला गणपती, व्यासांसाठी लिहायला बसलेला ते गीता सांगणा-या श्रीकृष्णापर्यंतच्या रुपातील सर्व मुर्त्या पाहिलेल्या. वाट्टेल त्या रूपात भेटू शकणारा एकमेव देव म्हणजे गणपती! मी आहेच तुझ्यासोबत, तू पहिलं पाऊल तर उचल, असा विश्वास मनात जागवणारा सख्खा सोबती.


करकचून ब्रेक लागत उदगीरच्या शिवाजी पुतळ्याशी कॉलेजची बस थांबली आणि विचारांची तंद्री मोडली. उतरून तडक पोस्टर्सचं दुकान गाठलं. त्याकाळी शाहरूखचा देवदास गाजलेला. हातात दिवा घेऊन देवदासची वाट पाहणारी अस्वस्थ पारो आणि "जब जब मै सांस लेता हूं तब तब तुम्हारी याद आती है" म्हणणारा विकल देवदास...  आणि माझी नजर शोधतेय गणपती! दुकानदाराला सांगितल्यावर चटकन आत जाऊन त्याने डिसप्लेला नसलेला स्टॉक आणला. A4 साईज मनात भरेना. मग अजूनच राखीव स्टॉक बाहेर आला. फूट उंच गणरायाचे पोस्टर जे काही मनात भरलं की बास, तोवर मैत्रिणीने A4 अस्वस्थ पारो पॅक करून घेतलेली.


मला आजही काय विसरता येत नाही तर, ते पोस्टर पाहिल्यावर आजीला झालेला अतीव आनंद. ते पोस्टर लावताना, बबल्स येऊ नये म्हणून माझी आजीची आणि मैत्रिणीची झालेली अशक्य कसरत. अभ्यासाला बसल्यावर सतत तो दिसावा म्हणून मांडलेली बैठक. दिवसाच्या कुठल्याही क्षणी त्याच्याकडे पाहिल्यावर मिळालेला आश्वस्तपणा आणि ते घर सोडून जाताना पोस्टर काढायचा प्रयत्न केला तर ते फाटेल म्हणून ते तिथेच सोडून जाताना दाटलेले कढ.  


गोष्ट छोटीच आहे, पण श्रद्धेने मनाला आलेला ओलावा माणूस म्हणून जगताना कायम उपयोगी पडत आलाय, पडत राहणार आहे.  अशा या विघ्नहर्ता श्री गणेश उत्सवाच्या तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मंगलमुर्तीचे हे आगमन तुम्हां आम्हां सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे असू दे.... बोला बाप्पा मोरया

-बागेश्री

Post a Comment

0 Comments