शिदोरी

     

  मी ज्या टेबलाशी बसून लेखन करत असते, त्या बाल्कनीच्या खाली एक "टॉडलर गार्डन" आहे. इवली इवली मुलं तिथे खेळायला येत असतात. तिथे रोज या वेळी म्हणजे  सकाळी १०.३० च्या सुमारास एक आजोबा त्यांच्या नातवाला खेळायला, जरासं ऊन अंगाखांद्यावर घ्यायला घेऊन येतात. नातू या- त्या खेळण्यांवर खेळत, उठत धडपडत असतो, आणि आजोबा त्याच्या पाठी- पाठी त्याला केवळ सपोर्ट म्हणून उभे असतात. नातू मग्न झाला कि आजोबा गाऊ लागतात. रोज एक नवं गाणं. बरं त्यांचा आवाज इतका सुरेल आहे, की काही काळ मी लेखन थांबवून ते ऐकत बसलेली असते. मला आवडतं काय, तर आजोबांच्या गाण्यांची निवड! एवढी अस्सल मराठी! आज त्यांनी सुरुवातच "तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने.." पासून केली. मधेच ते त्याची हनुवटी हाताने धरून "तोडी सोन्याचा पिंजरा.." म्हणाले. मला बसल्याजागी भरून आलं. मुळात एक निःस्वार्थ नातं. त्या बाळाला आज यातलं काही समजतही नसेल पण त्याचं मन नक्कीच सारं काही टिपून ठेवतंय. त्याच्या हनुवटीला धरून, ते जेव्हा- जेव्हा गातात तेव्हा ते लेकरू "आबा" म्हणून लडिवाळ मिठी मारतं, असं कसं त्याला नक्कीच काहीतरी कळतं! काल याच वेळी ते "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.." गात होते. त्यांचा क्रम बदलत नाही "तो राजहंस एक" ते त्याच्या हनुवटीला धरून गातात आणि ते लडिवाळपणे त्यांना बिलगतं. हे रोज घडतं. गाणं बदलतं, पण त्यातून हे आबा नातवाच्या आत, आयुष्याला पुरेल असं बळ सोडत असतात आणि त्या दोघांच्या निःस्वार्थ प्रेमाचा सोहळा, मला अनुभवायला मिळतो. जरासं खेळून आबांच्या खांद्यावर नातू निजतो आणि त्याला जाग येणार नाही या बेताने ते गुणगुणत त्याला घरी घेऊन जातात.

               मला वाटतं, आपण लहानाचे मोठे होतो खरे; परंतु अशी अनेक नाती ज्यांनी बालपणी आपल्याला ह्या मायेने, जिव्हाळ्याने जपलेले असते, घडवलेले असते तीच माया जन्माची शिदोरी असते. जन्मभर पुरून, शेवटी बोटभर उरणारी!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments