कूस स्वप्नांचीही वळते...


उरी काहूर का आहे,
मन एकाकी असताना..
चंद्र आतूर का आहे,
साथ कोणीच नसताना

कुठला वारा सुटला हा
अन् पाचोळा झाला..
सारे नव्हते होत्याचे
वादळी चिन्हच नसताना?

रंगांचे फिकूटले होणे
सांज अस्ताला जाताना..
वातींचे फरफरणे खोटे
जीव जीवात नसताना...

क्षणांची होती ही पाने
पूर आठवांचा येताना,
पानांचे तरंगणे होते
डोळा पाणीच नसताना...

हे रस्ते ओलेसे
हवेला नूर ही आहे...
मातीला गंध ही ओला
आभाळी ढगही नसताना..

मनाचे गुलाबीसर होणे
निळाई गर्द होताना
कूस स्वप्नांचीही वळते
पापणी हलके मिटताना

-बागेश्री

Post a Comment

1 Comments