हा खेळ सोंगट्यांचा....

आयुष्याच्या पटावरचा
हा खेळ,
डाव खेळताना चाली मात्र माझ्या...
कधी डौलातली सरळ,
कधी बेरकी तिरकी,
कधी एक दोन अडीच,
तर कधी एकच सावध पाऊल.....

पण कधी अचानक कळतं!
मांडलेला डाव तुझाच,
चालही तुझीच,
पायाखालची काळी-पांढरी घरं,
नुसताच आभास!

सोबतीच्या सोंगट्यांचा आधार,
तो खरा?
रंगातच गल्लत होते,
आपल्या परक्यांची!

पट माझा नव्हता,
डावही,
चालही नाही अन
ज्याच्या संरक्षणासाठी डाव मांडला,
तो ही माझा नाही....

हा खेळ होता,
तुझ्या करमणूकीसाठी, तू मांडलेला...

मी, एक सोंगटीच....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments