नवी नवी उभारी येते

त्या नापिक जमिनीच्या वाटेला
कायम हेटाळणीच आली!
दोष तिचा नव्हता.
अन् हेटाळाणी करणार्‍यांचाही!

निसर्गाच्या अवकृपेला उत्तर काय?

एकदा मग गम्मत झाली!
तिला कुणी सखी मिळाली.
तिच्या आसपासचा एक तुकडा
असाच नापिक, उजाड, पडका!
करी जो परक्याचे दु:ख आपुले
सुखात मानी सुख आपुले..

अशी वेगळी सखी लाभली
जगण्यास नवी मौज आली,
दोघींमध्ये मैत्री झाली
दु:खालाही वाट मिळाली
स्नेहबंध मग दृढ़ झाले
गप्पांमध्ये दु:ख निमाले..!!

रोज जाई माळी काका
ह्या तुकड्यातून पलिकडल्यावर
त्रस्त होई अनेकदा तो
फुले ना इथे अन् काही त्यावर!!
तरी न दमतो, प्रयत्न करतो
हळूहळू मग कळले त्याला
वाट जोडते दो तुकड्याला
तिकडे काही फुलते आहे!
बारिक बारिक हिरवे तंतू
आकाशाकडे टक्क पाहती
निर्भिड छाती मानही वरती....

पायवाटेवर फुलू लागले
हिरवे मोती लख्ख पोवळे
बघता बघता डोलू लागले
चारी दिशांना हसू फाकले
किती कौतुके होती त्याचे
माळी काका दोन बहिणी
लाड प्रेमाचे करती सोहळे

निसर्गाने द्यावे लागते
खुल्या मनाने घ्यावे लागते
आनंद देता- घेता येतो
दु:खालाही पाझर फुटतो
दुसर्‍याच्या सुखात जेव्हा
सुख आपले पाहता येते
मरगळलेल्या मनासही मग
नवी नवी उभारी येते!
नवी नवी उभारी येते!

-बागेश्री
17/10/2014

Post a Comment

0 Comments