तोतया

मी :  आलेय परत
मन : खरचटलं?
मी :  अं?
मन : अगं लागलंय का फार?
मी :  नाही रे, चालायचंच
मन : आवाज का पडलाय मग?
मी :  तू म्हणतोस तेच खरं
मन : काय?
मी :  आपण कटपूतल्याच
मन :  .. ..
मी :  तो नाचवणारा वर बसलेला
मन : नवा अनुभव?
मी :  म्हणशील तर नवा
मन : नाहीतर?
मी :  सोड!
मन : बोल...
मी :  आपण कुणीच नाही आहोत. मी हे केलं, मी ते केलं... सारं काही ठरलेलं आहे, आपलं करणं नाहीच ते
मन : कळतंय?
मी :  तो सांगतो, ओळख कुणाशी, किती ठराविक, मिळवलं काय, माहितीचा वापर कसा करायचा, सारं!
मन : ?
मी : नंतर कळतं... आपण फक्त हात, पाय, कंबर डोलवली... गाणं संपलं, खेळ खतम.
मन : काहीतरी चांगलंच लागलंय!!
मी :  नाही रे, एक नाच संपला.
मन : लागा पुढच्याच्या तयारीला
मी :  का रे सगळे मुखवटे असल्यागत वागतात?
मन : चांगलं समजत होतं सगळं! ह्या प्रश्नाशी पोहचून गोंधळतेस
मी :  म्हणजे??
मन : बदलत्या जगात कुठली तरी चिकट मुल्ये जपली आहेस.
मी : अरे....?
मन : मग दुखावलं की येतेस रडत
मी :  काय करू? त्यांच्याच सारखं वागू?
मन : काय फरक पडतो?
मी :  नक्कीच पडतो
मन : हेच ते! इथेच बुरसटलेली आहेस तू
मी :  काहीतरी बोलू नकोस, समोरचा खंजीर उचलतो म्हणून मीही वार करावा, किंवा सरळ सरळ त्यांच्याच सारखं वागावं? मला पटत नाही
मन : मग सोस, मूकपणे!
मी :  पण, आपले आपले म्हणवणारे तरी असे का?
मन : आपले? इथे "स्वार्थ" पाहिला जातो, तोच साधला जातो
मी :  माझं कुठे चुकतं? मी स्वार्थी नाही, इथे?
मन:  तुझाही तोतया आहे.
मी:   माझा.. ?
मन : हो
मी :  मला वाटत नाही
मन : विचार केलायस कधी, तुझं सुख कशात आहे, आनंद मिळवण्याचे मार्ग कुठले
मी : नाही, ते ध्येय नाही
मन : तेच ध्येय असतं. सगळ्यांचंच. कुणाला कळतं, कुणी मान्य करायला तयार नसतं. त्यासाठी माणसांचा "वापर" ही बिनघोर केला जातो.
मी :  काय हे वाभाडे? असं जगतात?
मन : आता असंच जगतात
मी :  मगच सुखी राहता येतं? तोतया बनून वावरल्यावर?
मन : हो ... जखमा कमी होतात! अतिप्रामाणिक राहून व्हायचे ते आरोप होतातच
मी : माझा तोतया नाही! मी सांगते, नाही म्हणजे नाही
मन : खरं?
मी : ..........
मन : तू "स्वतःला" मध्यवर्ती ठेवतेस, पण मान्य करत नाहीस!
मी : ?
मन : जगाचं कल्याण कशाला?
मी :  इतरांना जगवत, जगायला आवडतं
मन : छान फसवतेस स्वतःला
मी :  मी?
मन : इतरांनी खूष रहावं म्हणून का झटतेस?
मी :  त्यांना बरं वाटावं म्हणून
मन : त्याने काय होतं?
मी :  मला बरं वाटतं
मन : !!
मी :  काय? सुचवायचंय काय
मन : म्हणजेच "स्वतःला" ना!
मी :  हो, मग.
मन : मग, हे मान्य का करत नाहीस, की स्वतःलाच प्राधान्य देतेस!!
मी :  काय हे, मी ही यांच्यातलीच?
मन : सारे, सारखे.
मी :  नाही रे, पटत नाही हे. तुला काय म्हणायचंय, सार्‍यांचाच तोतया आहे इथे?
मन : होय
मी :  मग खरं कोण?
मन: कुणीही नाही
मी :  म्हणजे?

मन : तो नाचवतो, तुम्ही नाचता.
तुमच्यातला तोतया मात्र सारं मीच केलं ह्या दिमाखात!!

-बागेश्री
15 Nov 2011
Modified: 7th Oct 2014

Post a Comment

0 Comments