मदारी

तुझा आदर ह्याचसाठी वाटतो की,
प्रत्येक सुखस्वप्नाला दु:खाची झालर देतोस
लक्ष पुरवतोस की, फक्त सुख घेऊन वावरु नये.
आधी दोन्ही हात दु:खाने चिकटवावेत, मगच ओंजळ सुखाने भरावी.
म्हणजे सुख गळूनही जात नाहीत आणि नितळपणे तळाचं दु:खही दाखवत राहतात!

ह्याचसाठी आदर वाटतो की, 
तू भरारु देत नाहीस.
वाढलेल्या गतीला नशीबाच्या खुंटीला बांधून ठेवतोस,
जाणतोस आमची त्रिज्या आणि तेवढ्याच लांबीचा दोर ठेवला आहेस
आदर वाटतो, की
त्या दोराचं दुसरं टोक हातात ठेवून आम्हाला हवं तसं नाचवू शकतोस
सारं कळूनही बेमालूम, दिलखुलास, दगडी हसू शकतोस...

इतकंच म्हणते,
तुझ्यातला मदारी दीर्घायू होवो.

-बागेश्री  

Post a Comment

0 Comments