प्रवाह

एक उंचच घडा आहे
त्यात लाखो करोडो क्षण आहेत
ते सगळे आपल्याला जगून संपवायचे आहेत.
प्रत्येकावर आपला ठसा उमटवून ते भूतकाळाच्या घड्यात टाकायचे आहेत.
प्रत्येक क्षणाचं स्वागत झालंच पाहिजे, कारण
तो नवा आहे.
त्याला तुम्ही कोण आहात माहिती नाही.
तुम्हालाही त्या क्षणाचं रंग- रूप माहिती नाही.
स्वागत. जगणं. जगलेला क्षण मागे टाकणं पुन्हा
पुढच्याचं स्वागत,
करत रहा
करत रहा..
क्षणांचा निश्चित आकडा माहिती नाही
घड्याचा खोल- उथळपणा माहिती नाही.
किती क्षण उरले आहेत
किती मागे सरले आहेत
माहिती नाही
मंत्र एकच,
जगत रहा
जगत रहा...

अडे जो थांबे तो
काळाला तुंबणं आवडत नसतं
क्षणांचा प्रवाह अस्खलीत राखण्यालाच
जगणं वगैरे म्हणायचं असतं
पुढ्यातला क्षण फक्त जगायचा
न त्याच्या मोहात पडायचं
न त्याला अडकून ठेवायचं
तो आला आहे
तो जाणार आहे,
वाहू द्या
वाहू द्या
... कारण पलीकडे एक उंचच घडा आहे
त्यात लाखो करोडो क्षण आहेत
ते सगळे आपल्याला जगून संपवायचे आहेत.
प्रत्येकावर आपला ठसा उमटवून ते
भूतकाळाच्या घड्यात टाकायचे आहेत.
-बागेश्री

Post a Comment

0 Comments