तू स्पर्श केलास आणि
शरीराचे लक्ष स्फटिक झाले
तुझ्या पायाशी आरास पडली
बांधलेलं चैतन्य मुक्त झालं
खोलीभर प्रकाश झाला
तो स्पर्शाचा क्षण
तुझ्या बोटावर
लख्ख गोंदला गेला
तू मूठ बंद केलीस
आणि प्रकाश सरला..
आता तुला हवं तेव्हा
एक चैतन्य
तुझ्या भवताल उतरतं..
पसरत राहतं
धुपाचा शुद्ध गंध
आहे त्याला
त्या चैतन्यात
जेव्हा जेव्हा
तू एकरूप होतोस
खोलीभर धुकं उरतं...

तुझ्या दैवी
मुठीत
असे कित्येक
प्रकाशकण
नांदतात
तुझ्या स्पर्शालाच
मुक्ती म्हणतात

-बागेश्री