किनारा

खार वारा
गार रेती
एकल किनारा
काठाशी लाटांची लपलप
एकसर उमटणारी पाऊलं
निळा कोवळा अंधार
अशातच
बोटात गुंफली जातात
दैवी बोटं
जाणवतं
मनाच्या समुद्रावर
तू उतरून आला आहेस..!

तुझी सारी व्यवधानं
तुझं वलय
तुझं नाव उतरवून
एकटाच आला आहेस
एकाएकी चालण्याला ताल येतो
आता रेतीत चार पाऊलं उमटत राहतात
सागराची अखंड गाज आणि
तुझ्यामाझ्यातली शांतता
ह्याखेरीज बोलत कुणीच नाही
अंधार गर्द होतो
गाज गंभीर होते
गुज गहिरे होते
आणि आपण
रात्र ओढून घेतो,
चालत राहतो...
दिशांचं भान नाही
वेळेची काळजी नाही
लाटांची पावलांशी ओळख पटते
माखलं पाऊल स्वच्छ होतं
नजरेला नजर भिडते
अस्तित्व लख्ख होतं..
क्षितिजावर उजाडेल बहुधा

क्षितिजावर उजाडेल बहुधा
तुझ्या बोटांची
चाळवाचाळव होतेय..
मला परतावं लागेल
तुला परतावं लागेल

किनारा इथेच असणार आहे

-बागेश्री

Post a Comment

0 Comments