सागरा

यावंच वाटत नाही परतून
जगण्याशी गाठभेट झाल्यानंतर
वाटतं रमावं तिथेच नी
हातात असू द्यावेत हात
मिळवत रहावी संजीवनी
नितांत..
भूल पडत राहते
बेभानीची झापड येते
पण
तू समजावून सांगतोस
दरवेळी
की आत्म्याने शरीराबाहेर
रमू नये फार
जावं परतून
आपल्या घरी..
देतोस जीवनाची पुरचुंडी बांधून
परतीचा प्रवास मोठा
म्हणून
तुझ्यातलं असं जगणं
कणाकणाने मला बांधून देण्यापेक्षा
तू मला सामावून का घेत नाहीस?
नदीला असं परतवू नये रे, सागरा!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments