आभास

...शेवटी पाठ करून
ती मंदिराच्या पाय-या उतरू लागली
तिच्या लक्षात आलं होतं
त्याचा मोठेपणा म्हणजे निव्वळ आकाश
त्याला शिवण्यासाठी जितकं वर जावं
तितकं
अजूनच उंच जाणारं... आकाश!
एक एक पायरी उतरताना
तिला आठवत राहिला
चढतानाचा प्रवास
ज्या ओढीने ती धावत आली होती
त्यापायी झालेली दमछाक
लागलेला श्वास
मधेच एकदा वळून तिने कळस पाहिला
तो तळपत होता
तो तळपत राहणार होता
हाती कोरडा आभास घेऊन
अनेक सामान्य इथून
परतले होते
परतणार होते
स्वतःला गहाण ठेवून
ती वेळीच निघाली होती
जशी उतरत गेली
तसं पायातलं बळ वाढू लागलं,
जमीन दिसू लागली
तसा आत्मविश्वास दुणावला
आता आभासी देवत्वाची कल्पना तिला साद घालत नाही
-बागेश्री

Post a Comment

0 Comments