वही पार उलट- सुलट करून झाली

वही पार उलट- सुलट करून झाली!

ह्याच पानावर तर लिहीत बसले होते, 
पानावर तारीख दिसते आहे, वारही आहे 
पण मजकूर कुठे? 
काल नाही का, 
खिडकीतून मंद झुळूक येत होती
मी लिहीत बसले होते
कधीतरी डोळा लागला... 
बरीच शोधाशोध झाली, 
वही पार... उलट- सुलट करून झाली, 
हाती काहीच आलं नाही
नंतर कधीतरी घर स्वच्छ करताना 
कपाटाखाली 
पलंगाखाली 
टेबलाखाली 
नुकत्याच धरू पाहणा-या जळमटात, 
शब्दच शब्द! 
मळलेले, धूळ साचलेले... 
मग त्यांची स्वच्छता झाली... हिवाळातल्या मऊ उन्हात वाळवून निघाले...!
पण आता मात्र, 
पूर्वीचा त्यांचा क्रम काही केल्या लागत नाहीये.. 
संदर्भ बदलतात
व्यक्त होणंही!
     
-बागेश्री

Post a Comment

0 Comments