पाऊस होऊन भेटशील?


अशाच एका पावसाळी
तू भेटला होतास मला...
धरला होतास तुझा काळाकभिन्न हात माझ्या डोक्यावर, म्हणालास,
"भिजू नकोस. सर्दी होईल. शिंकशील, हैराण होशील, तापाचं अंग घेऊन कामाला येशील, नकोच भिजूस."
तुझा पुरूषी हात बाजूला सारत, मी म्हटलं होतं,
"मला आवडतो पाऊस"
मला आवडतो पाऊस
त्याने दिलेली शिरशीरी आवडते
मनात पाझरत जाणारी हुरहूर आवडते
दाटून येणार्‍या आठवणी आवडतात
डोळ्याच्या पाणावणार्‍या कडा आवडतात,
मला आवडतो पाऊस.
म्हणालास,
"कातर होशील. थरथरशील. भावनांची गर्दी होईल, त्यातच हरवशील, नकोच भिजूस."
म्हटलं
होऊ दे जे व्हायचंय ते.
फार कोरडं ठेवलंय स्वतःला
भावनांचे स्पर्श विसरलेय
अंगावरले रोमांच विसरलेय
काहीतरी मुरु दे
मरगळ जरा सरू दे
माझी मला ओळख दे
छत्री नको....
नखशिखांत भिजू दे
ऐक गं
"हा दुष्ट आहे. आज कोसळतोय उद्या नसणार आहे.
झुरशील. त्रास होईल. त्याला फक्त त्याचा आवाज कळतो. तुझ्या हाका ऐकूही जाणार नाहीत.
चल माघारी, आडोसा आहे. नकोच भिजूस, वेळ अघोरी आहे"
म्हटलं
आज जगून घेऊ?
एकच दिवस?
त्याचा स्वभाव माहिती आहे मला
तो अपेक्षेविना येतो.
अपेक्षेशिवाय देतो.
त्याला आणि मला जगू देशील?
कुठलाही अडसर न ठेवता,
आज मला भिजू देशील?
तसा अदॄश्य झालास आणि पाऊस थांबला.
तुझ्या काळाशार हातांचा मेघ,
माझ्यासोबत पाऊस होऊन चालला होता,
हे कळेस्तोवर निघूनही गेलास....
आता नियमित पावसाळा येतो.
आसमंत भिजून जातो
माझ्या डोक्यावर मात्र कधीच मेघ नसतो.
अशाच एका पावसाळी, येऊन मला गाठशील?
माझ्यापुरता, माझ्या हक्काचा, पाऊस होऊन भेटशील?
-बागेश्री

Post a Comment

0 Comments