वगैरे, वगैरे

ती: (स्वतःशीच पण मोठ्याने)
धरणीने घातली साद वगैरे
 ... आकाशाचे मोडले छप्पर वगैरे
 तोडून वीजेची कडी जबरेने
पावसाने घेतली झेप वगैरे

तो (स्वतःशी)
बाप्रे! कवितेचा मूड!!! आता हिला ह्या मुडातून बाहेर काढायची म्हणजे टरबूजाची बी सोलताना साल न तुटण्याची काळजी घेण्यासारखं आहे. नाहीतर "जायचा इथे माझाच बळी.. वगैरे.."  ई शी हे काय बोल्तोय मी.

(मोठ्याने, गुणी नव-याच्या आवाजात)  अगं मी काय म्हणतो

ती: आताच म्हणायला हवंय का? लिहीतेय ना मी!

(जरासा सटपटतो पण बेअरींग सोडत नाही)

तो: मी म्हणत होतो की, तो कमी दाबाचा पट्टा जरा महाराष्ट्राकडे सरकू दे ना

ती: ( एखाद्या वेड्याकडे पहावं त्या नजरेने) त्याचं इथे काय?

तो:  मग पाड की झक्कास कविता

ती: पाड!!!!

तो: (टरबूजाची बी तडकलीच) आय मीन

ती: (वर्च्या पट्टीत) त्या चकल्या आहेत, जिलब्या की झाडाला लटकलेली फळं?

तो: अर्रे हां! मी म्हणत होतो, ते मघाशी चहा करणार होतीस ना? पाsssवसाळी झालीये हवा.. वगैरे?

चहा तिचा विकच पाँईन्ट! बी तडकलेल्या आवरणातून तणतणत बाहेर येते, किचनमध्ये जाते आणि तो "हुश्श" म्हणत बाल्कनीत जाऊन बसतो!! मोबाईलवर सावन अ‍ॅप्लिकेशन शोधून लताच्या आवाजातलं तिचं फेवरीट "रिमझिम गिरे सावन.." गाणं लावतो. रिपीट मोडवर.
                 चहा येतो. चहा एक-एक घोट करत संपत जातो.. लता "सुल...ग सु...लग" म्हणताना दरवेळी त्याची मान डोलते. दोघेही गाण्यात आणि चहात डुंबलेले. दोघांत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होतात. गार वा-याची झुळूक येत राहते... दोघे अबोल होत ते अनुभवत राहतात.
          ती केव्हातरी उठून जाते, रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला! तो बाल्कनीतला लाईट लावून, हाती वर्तमानपत्र घेऊन जगभरातल्या घडामोडीत गुंतून जातो!

अनेक पावसाळे येतात. जातात. ऋतुचक्र फिरत राहतं, नातं घट्ट- मुट्ट, मुरत राहतं. आधीची हुरहूर, दाटणारं काहूर सगळं शमून नात्याला समजूतदारपणाचा वर्ख चढतो. कधी विनोदाची फोडणी, कधी रागाचा तडका कधी सपक अबोलपणा तर कधी मसालेदार थट्टा- मस्करी करत जगणं सुरू असतं. आयुष्याचा मोठ्ठा प्रवास एकट्याने करणं जिकीरीचंच. तिथे पलीकडे, त्या टोकाला पोहोचायचं असतं! प्रवास सोपा सुटसुटीत असता तर  चिंता नव्हती इथे नागमोडी वळणं, डोंगर द-या, कुठे राजमार्ग तर कुठे पायवाट. शिवाय प्रवासातली अगणित संकटे. आणि तशातच तब्बेत!
ती अशा खडतर प्रवासात उत्तम कशी राहिल? अनेक ऋतूंची आवर्तनं होत राहतील. कधी सारं काही जपलेलं करपवून टाकणारं उन पडेल, तर कधी काडी- काडी जोडलेलं उडवून नेणारा सोसाट्याचा वारा असेल, कधी होत्याचं नव्हतं करणारा पाऊस तर कधी आत्मविश्वास गोठवणारी थंडी! अशावेळी सावरणारे दोन हात आणि समजून घेणारं मन हवंच सोबतीला.
          प्रवासभर अशी एकमेकांच्या सहवासाची शिदोरी पुरवत पुरवत त्या टोकाला पोहोचायचं असतं....

रिपीट मोड वरचं गाणं कुणाचा तरी कॉल आल्याने थांबलं आणि ह्याचीही तंद्री भंग झाली.

ती  आत पोळ्या करत काहीतरी गुणगूणत होती. तो तिथे जात म्हणाला...
अगं ते "हे ते वगैरे, वगैरे" कवितेच्या पुढच्या ओळी सांगतेस ना, मी घेतो लिहून . त्याच्या हातातली वही पेन आणि चेह-यावरचे स्निग्ध भाव तिने टिपले. आणि दिलखुलास हसत समोरच्या खिडकीची काच उघडली... पावसाचे हलके तुषार खिडकीच्या कठड्यावर भुरभूरत राहिले...

   -बागेश्री

Post a Comment

0 Comments