चांदण्यांची शपथभूल 
मोडता यायला हवी..
राहत्या वस्तीतून 
उठता यायला हवं..
आकाशाची स्वप्नं उशाशी 
जगणं फुलण्याची आस निरंतर
आशेची माती
भेगाळता,
रेंगाळणं टाळता यायला हवं..
आपल्यापूरतं आपलं गाव
वसवता यायला हवं!

नसो भांडवल गाठी
नसो कुणीही साथी
डोळे धुवून वास्तवाने
भविष्य घ्यावे हाती..
आपल्यापरीने नाव आपलं
कमावता यायला हवं...
अंधारातून उजेडाकडे
नकारातून होकाराकडे
जीवाच्या या पाखराला
उडता यायला हवं
आपल्याकरता आपलं आकाश
व्यापता यायला हवं...

राहत्या वस्तीतून एकदाच
उठता यायला हवं,
आपल्यापूरतंं आपलं गाव
वसवता यायला हवं...!!

-बागेश्री