आपण हात पुढे करून
अलगद घ्यावे उतरवून
आपल्या लाडक्या व्यक्तीला,
आपल्या भावनेत...
आणि मग
द्यावी लोटून
ती भावनेची होडी
आपल्याच अस्तित्वाच्या
मुग्ध डोहात....
....त्या व्यक्तीनेही
करावा मुक्त विहार
हाकावी होडी बिनदिक्कत
नि घ्यावी जाणून डोहाची
शांतता, स्तब्धता
प्रत्येक तरंग
अंतरंग!
जणू व्हावे
पाण्याशी
एकजीव
एक रंग...
या विचाराने गर्द
शहारा उठला अंगभर
मोडली तंद्री अन् 
वेळेचे भान आले झपकन..
तत्परतेने
स्वतःची शाल
माझ्याभोवती लपेटत
आलेला शहारा टिपत,
ती व्यक्ती काळजीने पुटपुटली 
"आज गारठा जरा जास्तच आहे, नाही का....."
-बागेश्री
 
  
 
 
 Posts
Posts
 
 
 
0 Comments