मोरपीस

मी अजूनही जिवंत ठेवल्या आहेत
त्या सर्व जागा
जिथे तुझ्या स्पर्शांची ओळख
रेंगाळली होती कधी काळी..
गाईच्या घंटेपासून ते
रानाच्या पायवाटेवर
उमटत गेलेल्या तुझ्या
हाता- पावलांच्या ठशापर्यंत....
तुझ्या पाव्यापासून,
कुंजवनात तू भान हरपून डोलताना
तुझ्या अंगाखांद्यावरुन
टपटपून गेलेल्या आम्रमोहोराच्या
बहरापर्यंतचे सारे सारे काही
मी जिवंत ठेवले आहे,
पुन्हा पुन्हा त्या जागांना भेट देऊन
माझ्या मनात तुला जागते ठेवून..
इतकेच काय तर
कधीतरी केसात मोरपीस माळून
कान्हाच झालेय मी
आणि तुझ्या गोपिकांनाही
पडलीये भूल, जणू काही साक्षात
तूच आला आहेस
उभा आहे त्यांचा गोप, कृष्ण, मुकूंद, प्राणसखा
पुन्हा त्यांच्यासमोर!
त्यांनी धरलाय फेर माझ्याभोवती
इतकी तुझ्या रुपात समरूप होऊन
मी घेतलाय पदन्यास कान्हा,
विसरून आपल्यातलं अंतर
माझ्यातून तू उमलून आला आहेस,
कैक वेळा!
तेच मोरपीस रात्री
उशाशी घेऊन नकळत मोकळा होतो बांध
झिरपत राहतात डोळे
माझ्याच चकव्यात अशी वारंवार मी
बुडत सावरत राहते म्हणून...
पण मला सांग, एकदाच सांग
त्या त्या वेळी दूर तिकडे इंद्रप्रस्थात
तुझ्या मोरपिसालाही ओल येते का रे?
-बागेश्री

Post a Comment

0 Comments