हक्काची माणसं

काळजी घेणारी हक्काची माणसं, आपला वेळ सहवास देऊन तुमच्या सोबत राहणारी असतात तेव्हा बहुतांश त्यांच्यातील दुर्गुण आपल्याला दिसायला लागतात. त्यांच्यातील न आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला खुपू लागतात. मग त्यांचा वेंधळेपणा असेल, पसारा करण्याची वृत्ती असेल, हट्टी स्वभाव असेल, आग्रही, दुराग्रही, अट्टहासाने अमुक तमुक करून घेण्याची वृत्ती असेल.. ही माणसं आपल्या इतक्या जव असतात की आपली जवळची नजर फक्त या दुर्गुणांवर स्थिर होते.
       आयुष्य पुढे जात असतं. आज आहेत ती उद्या नसतात. एक एक माणूस गळून जातं. आयुष्य कधीतरी वाळवंटी होतं तेव्हा आपल्याला तीच माणसं त्याचं आपल्यासाठीचं झटणं, तेव्हा न जाणवलेलं पण अखंड आपल्या सोबत असलेलं प्रेम आठवायला लागतं. तेव्हा जाणवतं ती माणसं मृगजळ नव्हती. आपल्या आयुष्याला खळाळ देणारे, वाहते प्रसन्न झरे होते...  तेव्हा आपण त्या झऱ्यात न्हाऊन निघालो नाहीत, ते मुक्त तुषार अंगावर घेऊन, निर्मळ वागलो नाही. आपण त्या दगडासारखे राहिलो ज्यांच्या कड्यावरून झेप घेत झरे पुढे निघून गेले.... आयुष्यात असे खळाळते झरे फार कमी मिळतात.. ते असतांना त्यांच्यासोबत, त्यांच्याइतकं प्रवाही व्हायला हवं... त्यांच्या सहवासात न्हाऊन जायला हवं. शेवटी वाळवंट कुणाला चुकलेय? पण तिथे उभे असू, एकटेपणाच्या उन्हाने कोळपले असू तेव्हा पूर्वी आपण झऱ्यांचा सहवास आनंदाने उपभोगला हे आठवून होणारं समाधान पावसाच्या शिडकाव्यासारखं सुख देऊन जाईल हे नक्की...
-बागेश्री

Post a Comment

2 Comments