कलत्या दुपारच्या
अडनिड्या उन्हाला
संध्याकाळेने धप्पा दिला
आणि दिवसभर
दमल्या भागल्या
साऱ्या सावल्या
लांब लांब झाल्या...
मोकळ्या मोकळ्या रानातून
रस्ते- कच्च्या पायवाटांंतून
गल्ली बोळातून
शेतामातीतून
शाळा कॉलेज
ऑफिसमधून
स्वतःला घट्ट सावरत,
घराकडे धावल्या!
अशक्य वेगाने
भिरभिरणा-या
आपल्या भोवतीच
गिरगिरणा-या
तप्त निळ्या सावल्या
गडद गाढ होत होत
काळ्या गार अंधारात
एकजीव कालवल्या..
उद्या पुन्हा
त्याच सूर्याची, तीच किरणे
आकाशातून उतरतील
लाख स्वप्न
उरात कोंडून
आशेच्या वेड्या
तत्पर सावल्या
सैरावैरा धावतील...!
-बागेश्री
0 Comments