जगातला जमेल तितका एकटेपणा
एकत्र करून
मी बांधणार आहे एक देऊळ
अजिंक्य डोंगराच्या
उंचच उंच टोकावर..!
आत असेल
एकांताची राजस मूर्ती,
जिचं आश्वासक हसू
खात्री करून देईल
तुम्ही कापून आलेलं अंतर
अर्थहीन नाहीय म्हणून..
मंदिराच्या कळसावर असेल
चालू बंद होत राहणारा
एकमेव दिवा
आयुष्यातल्या
आशा निराशेच्या
खेळासारखा..!
मग मी लांब,
खूप लांब
उभी राहून
पहात राहणार आहे
त्याचं तीर्थक्षेत्र होताना.....
नाहीतरी जगताना
मिळत गेलेला एकटेपणा
लोकांनी आणून
ओतायचा तरी कुठे?
-बागेश्री
0 Comments