Sunday, 18 December 2011

रिमझिम्म....!

खट्याळपणे आपल्याच धुंदीत,
माझ्या छत्रीवर बरसणारा तू....
आणि 'पिया बसंती रे....' गुणगुणत
घराच्या दिशेने निघालेली मी......

मन निवांत असलं ना, की तुझी बरीच रुपं दिसतात, साठवता येतात.... लोभसवाणी, निव्वळ..!
बर्‍याच दिवसांनतर झालेली लाडकी जाणीव.....!!

काळाशार डांबरी रस्ता, मस्त ओला झालेला
त्यावरचे तुझे तुषार....
भरधाव गाड्याच्या पिवळ्या झोतांमुळे मोहक दिसणारे तुझे थेंब...!

हिरवीगार पाने, त्यावरची ओल आणि रस्त्यांच्या कडेच्या लाईट्समुळे त्यावर
उतरलेली चमक.....
गढूळ पाण्याचे इवले-मोठे डबके,
त्यात तू धरलेला नाद!
सगळं कसं ल-य-ब-द्ध!
छत्रीवर, रस्त्यांवर, झाडांवर, डबक्यांमधे - रमलेले सूर...... सारेच गळात गळा घालून!

सकाळपासून शांत- एकलं उभं असलेलं माझं घर...
"सक्काळची जी जातेस, ती अंधारल्यावरच मला भेटतेस"- घराने रोजची कुरबूर केली....
आत आले दरवाजा उघडून...!

तुझा बाहेरचा नाद, आत काहिसा धीर-गंभीर जाणवला!

का रे असं..?

आत जबाबदार्‍या होत्या म्हणून??
बाहेरही असतातच की....
कदाचित जरा जास्त...!
मग हा बदल कसा?
की,
मघाशी काही क्षण, "मी" कोणाचीच नव्हते?
तू- रस्ता- डबकी- पिया बसंती- छत्रीवरचा ताल आणि...... आणि बरंच काही...

छान वाटलं रे, हलकं जरासं!
किमान थोडावेळासाठी तरी,

'स्व' ला गमावणं...!

-बागेश्री
२३/०८/११

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...