Friday, 26 May 2017

उत्सव

स्वतःला ओढून मी
वर्तमानात घेऊन येते आणि
दरडावते की
थांब, इथेच थांब
सर्वार्थाने जग, हा क्षण!
नीती- अनिती
योग्य- अयोग्य
सत्य- असत्य हा शोध थांबव
आणि
पुर्णत्वाने जग, हा क्षण!
वर्तमानाशी अशी
एकरूप होते आणि
उमजून येतं
की,
बाहेरचा आणि आतला
ऋतू एकजीव झालाय..!
निसर्गाने घेतलंय शोषून आपलं अस्तित्व
बघता बघता ह्या क्षणाचाच ... उत्सव झालाय!

-बागेश्री

Friday, 19 May 2017

काळजातली कविता

एखाद्या विचाराच्या
उनहून पाण्यात
काळीज ठेवावं गच्च भिजवून..
मुरू द्यावा विचार
त्याच्या रंध्रा रंध्रातून..
मग
पिळावं काळीज घट्ट
आणि भरावं पेन..
लिहावी
एखादी अस्खलित कविता

वाचणा-याच्या काळजाला ती
थेट न भिडली तर नवल!!

-बागेश्री

Saturday, 6 May 2017

गाळ

इतिहासाचा गाळ सातत्याने वाहत येऊन वर्तमानावर साचू लागला की भविष्ये तुंबणारच!

-बागेश्री

Thursday, 4 May 2017

आरसा

त्याला ती आवडायची
तिला तो
तिच्यातल्या अनेक गोष्टी त्याच्यासारख्या होत्या
त्याच्या तिच्यासारख्या
तिचं चिडणं
त्याच्यासारखं
त्याचं समजून घेणं
तिच्यासारखं
तिचा त्रागा
त्याचं प्रेम
तिचं गंभीर होणं
त्याचं द्रवणं 
ती आत्मकेंद्री
तो विचारी
ती गहन
तो गुढ
त्या दोघांचं
सगळंच कसं
एकमेकांसारखं....
...... पण तरीही कधीतरी
कुणीतरी एक, दुस-यापासून दूर झाला
दुसराही हळूहळू
दूर, खूप दूर गेला...

तसेही, दोन आरसे एकमेकांमध्ये काय शोधू शकतात?

-बागेश्री 

Monday, 1 May 2017

पूर्णत्व

मनाची माती घट्ट मुट्ट कालवून
मी तयार केली
माझीच प्रतिकृती
बराच वेळ एकटक न्याहाळल्यावर
जाणवलं..
अजून बरेच संस्कार करायचे बाकी आहेत...

स्वतःमधे स्वत:पुरतं पूर्णत्व यायचं बाकी आहे..

-बागेश्री

राधाक्षण

श्यामा,
दिवसभराच्या दगदगीनंतर
श्रांत होताना
तुझ्या भवताली
नक्कीच काही
राधाक्षण रेंगाळत असतील ना रे?
काय करतोस तू नक्की त्यांचं..
तुझ्या भोवताली असू देतोस
की, घेतोस उचलून कवेमध्ये
की, डोळाभर ते पाहून
मिटून घेतोस तुझे
विशाल टपोरे डोळे?
आपसूक
बासरीसाठी हात सरसावत
असेल रे तुझा
आणि ती शेल्यात नाही
पाहून चुटपुटतही असशील
की रमतोस,
रमतोस तसाच शांत
पापण्यामागे दडवलेल्या
राधाक्षणात, श्यामा?
तुझ्या दिव्य शक्तीने
तू जिवंत का करत नाहीस
त्या क्षणांतून मलाच
प्रत्यक्षात..
मी उरेन फक्त भवताली तुझ्या
करणार नाही हट्ट कसलाच
मला फक्त एकदा
एकदा तुझ्या
विशाल डोळ्यांत
प्रत्यक्षात आरपार व्हायचंय
कान्हा..
प्रत्यक्षात आरपार व्हायचंय


-बागेश्री 

बहुरुपियाँ

.... कुठल्याशा क्षुल्लक कारणावरून
तू रूसावंस आणि मी तुला
छातीशी घट्ट धरावं
असं किती वेळा झालं आहे कान्हा?
आणि तू माझ्यापासून दूर होत
निरागस डोळ्यांनी एकटक पाहू लागतोस
तेव्हा मला लहान, अजूनच लहान वाटू लागतोस
आणि तू देखील
किमयेने नाही का
रांगू लागतोस माझ्या भोवताली..
तुला उचलून कडेवर घेण्याचा मोह व्हावा तो
तुझ्याच खोड्यांनी त्रासलेल्या
अनेक गोपीकांच्या नकला उतरवून दाखवू लागतोस..
आपण बेभान हसतो कान्हा
आणि तू अचानक उठून धावू लागतोस
म्हणतोस..
"धाव राधे, पकड मला"
मघाचा खोडकरपणा
त्याआधीची निरागसता
कशी कुठे लुप्त होते मोहना
आणि कुठून येते अचानक
आवाजात हे आवाहन?
तू धावत राहतोस
तुला प्रत्येक खळगा पाठ
मी करते लाख प्रयत्न
तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा
तू न थकता, न थांबता विचारतोस
"दमलीस राधे, दमलीस का तू?
ये ना.. धर हा हात..."
मीही इर्षेने
त्वेषाने
माझा पायघोळ परकर सावरत
पोहोचू पाहते तुझ्यापर्यत
माझा हात
तुझ्या खांद्याजवळ येताच
तुझ्या सर्वदिशेने हाका येऊ लागतात कान्हा
"ये राधे... पकड मला"
लक्ष रूपांनी
तू माझ्या भोवताली
धावू लागतोस आणि माझी गती सरते
धाव थांबते
श्वास मात्र धपापत राहतो....
तुलाच सहन होत नाही
माझी अवस्था आणि
हळूवार हातानी एखाद्या प्रौढासारखा
मला थोपटत राहतोस
काळ्याशार डोळ्यात
गहिरं ममत्व घेऊन...

क्षणभरात मला अनेक नात्यांनी भेटून जातोस,  कान्हा
लाख रूपांनी भुलवीत राहतोस
मी तुझ्या प्रत्येक रुपात अडकून जाते..!

-बागेश्री