Wednesday, 15 January 2014

द्वंद

अविरत धडपड करून
मी चढून येते आतून,
बघते जग बाहेरचे
चेहर्‍याच्या बाल्कनीतून..

खोबण्यात डोळ्यांच्या
मी घट्ट दडून असलेली,
बाहेरच्या जगातले
संभ्रम जोखत बसलेली

कधी तुला वाटते मी
पाहू नये काहीही,                        
मज आत ढकलण्याची              
करतेस मग तू घाई..
घेतेस मिटूनी डोळे             
पापणीचा सुटतो हात,       
मी खोल ढासळत जाते
कोसळते आत आत                 
                                             
झटकते पुन्हा स्वतःला
साधायाचे काही आहे
मी चढेन पुन्हा पुन्हा
पडझड नेमाची आहे...   
            
हे द्वंद तुझे नि माझे
सरणार एकदा आहे
त्याच खोबण्यांतून मी
जाणार निसटून आहे...

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...