Saturday, 24 May 2014

पाऊस आणि ती

तू
इंद्रधनुचे सप्तरंग ल्यालेला
मी नुसतीच 'गव्हाळ'....

तू
सगळ्यांवर वर्चस्व गाजवणारा..
मी त्या सगळ्यातली एक....

तू
मनसोक्त बरसणारा,
मी मळभ बाळगत जगणारी....

तू
धुंद, शबनमी, निरागस,
मी फक्त आतुर...

छे....! अगं..
मी जर,
इंद्रधनुचे सप्तरंग ल्यालेला
तर तू
साज त्या रंगांचा!

मी जर,
सगळ्यांवर वर्चस्व गाजवणारा..
तर तू
ती ताकद माझी...

मी जर,
मनसोक्त बरसणारा,
तर तू
त्या बरसण्यामागचं प्रबळ कारण...

मी जर,
धुंद, शबनमी, निरागस,
तर 'तू'

जाऊ दे...
इतकं सहज आलं असतं सांगता,
तर युगानयुगे असा बेभान का बरसलो असतो??

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...